भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे नुकताच पार पडलेला कसोटी सामना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सामना होता. पराभवाच्या गर्तेत असलेल्या भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. भारताच्या या कामगिरीत सर्वात महत्त्वाचे योगदान होते ते रविचंद्रन अश्विनचे. अश्विनने सामन्याच्या पाचव्या दिवशी पाठीचा त्रास असून देखील हनुमा विहारी सोबत तब्बल दीड सत्र फलंदाजी केली. यानंतर जेव्हा अश्विन सामना संपल्यानंतर आपल्या रूममध्ये आला तेव्हा तो भावनिक झाला असल्याचे स्पष्टीकरण अश्विनची पत्नी प्रीतीने दिले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या स्तंभलेखात प्रीतीने लिहिले आहे की, सामन्याच्या पाचव्या दिवशी जेव्हा सकाळी अश्विन उठला तेव्हा तो प्रचंड वेदनेत जाणवत होता. अश्विनने मला सांगितले की त्याला फिजिओच्या रूममध्ये जायचे आहे. अश्विनला झुकता येत नव्हते व बसल्यानंतर पुन्हा उभे राहता येत नव्हते. मी अश्विनला विचारले की तुला फलंदाजी करता येईल का? त्यावर तो म्हणाला की मला मैदानात जावे लागेल. यानंतर आमची छोटी मुलगी अध्या म्हणाली की पप्पा आज सुट्टी घ्या. मला वाटले होते की अश्विनला स्कॅन करण्यासाठी पाठवले जाईल.”
प्रीती पुढे म्हणाली, “मी सामन्याच्या पाचव्या दिवशी बायोबबलमुळे सामना बघायला गेली नाही. मी माझ्या रूममध्ये होते व आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या मुलींना टीव्ही बघण्याची पूर्ण परवानगी दिली होती. मुलींमुळे मला कधीकधी सामना बघायला अडचण येते पण मी ठरवलं होतं की शेवटचा दिवस मी पूर्ण बघणार .”
अश्विन फलंदाजी करण्याअगोदर ड्रेसिंग रूममध्ये उभा दिसला होता. त्याबद्दल प्रीती म्हणाली ,”अश्विन फलंदाजी करण्यासाठी जाण्याअगोदर उभा होता ,कारण त्याच्या मते जर तो बसला तर फलंदाजी करण्यासाठी पुन्हा व्यवस्थित पणे उभा राहू शकणार नाही. हो मला त्याची काळजी वाटत होती, मात्र सरतेशेवटी त्याने उत्तम खेळत करत सामना अनिर्णित राखला.”
प्रीती म्हणाली की, “जेव्हा अश्विन सामना संपल्यानंतर रूममध्ये आला तेव्हा तो काही क्षण हसला व सोबतच रडायला देखील लागला. त्याला आनंदही होत होता व त्याच्या डोळ्यांतून पाणी देखील येत होते. हा एक वेगळाच अनुभव होता.”
प्रीतीने अश्विनला पाठीचा त्रास होत असल्याचा खुलासा ट्विटद्वारे देखील केला होता.
https://twitter.com/prithinarayanan/status/1348542761134301185
आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चौथा आणि मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेनला 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला धक्काच बसला’, पंतचा बॅटींग मार्क पुसण्याच्या आरोपानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया
AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान
कमालच! केवळ ३६ चेंडूत शतक करत सोफी डिवाईनने मोडला ११ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम, पाहा व्हिडिओ