ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लॅब्यूशेनने शतक केले. त्याच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात ५ बाद २७४ धावा केल्या आहेत.
मॅथ्यू वेड आणि मार्नस लॅब्यूशेन हे दोन खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांचाना वेगवान गोलंदाज टी नटराजनने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ अडखळेल असे वाटले होते. पण नंतर युवा कॅमेरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेनने संघाचा डाव समर्थपणे सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना दिवसाखेर विकेट जाऊ दिली नाही.
त्यामुळे पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ८७ षटकात ५ बाद २७४ धावा केल्या. त्यांच्याकडून पेन ३८ आणि ग्रीन २८ धावावंर नाबाद आहे. पेन आणि ग्रीनने ६१ धावांची सहाव्या विकेटसाठी नाबाद भागीदारी केली.
नटराजन चमकला –
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ६४ षटकांच्या आतच मार्नस लॅब्यूशेनने त्याच्या शतक पूर्ण केले होते. आता तो भारतासमोर आणखी आव्हान निर्माण करणार असे वाटत असतानाच त्याला ६६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर टी नटराजनने झेलबाद केले. लॅब्यूशेनने नटराजनच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू वर उडाला आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने कोणतीही चूक न करता लगेचच झेल घेतला. त्यामुळे लॅब्यूशेनला २०४ चेंडूत १०८ धावांवर विकेट गमवावी लागली. या खेळीत त्याने ९ चौकार मारले.
लॅब्यूशेन नटराजनची दुसरी कसोटी विकेट ठरला. त्याने याआधी मॅथ्यू वेडला बाद केले होते.
लॅब्यूशेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन फलंदाजीसाठी आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ६८ षटकात ५ बाद २१५ धावा झाल्या असून कॅमेरॉन ग्रीन ८ धावांवर आणि पेन ० धावावंर खेळत आहे.
लॅब्यूशेनचं शतक –
ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅब्यूशेन आणि मॅथ्यू वेडने तिसऱ्या सत्रातही चांगली लय कायम ठेवली होती. त्यांनी या सत्राच्या सुरुवातीपासूनच काही चांगले फटके खेळले. त्याचबरोबर त्यांनी एकेरी-दुहेरी धावांवरही लक्ष केंद्रित केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा धावफलक सतत हलता राहिला. दरम्यान लॅब्यूशेनने ६३ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराज विरुद्ध चौकार मारत त्याचे कारकिर्दीतील ५ वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने १९५ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याला त्याचे अर्धशतक करण्यासाठी १४५ चेंडू लागले होते. त्यानंतर त्याने ५० चेंडूत पुढच्या ५० धावा पूर्ण केल्या.
मात्र, त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतर त्याला शानदार साथ देणारा मॅथ्यू वेड बाद झाला. त्याला पदार्पणवीर टी नटराजनने बाद केले. वेडचा झेल शार्दुल ठाकूरने घेतला. त्यामुळे वेडला ८७ चेंडूत ४५ धावा करुन विकेट गमवावी लागली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ६४ षटकात २०० धावा केल्या असून सध्या लॅब्यूशेन १०१ धावांवर खेळत आहे, तर कॅमेरॉन ग्रीन ० धावेवर नाबाद आहे.
दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या १५४ धावा –
पहिल्या सत्राखेर लॅब्यूशेनने स्मिथसह ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला होता. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. त्यांचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ ३६ धावांवर ३५ व्या षटकात पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल रोहित शर्माने घेतला. पण त्यानंतर मॅथ्यू वेडने लॅब्यूशेनची चांगली साथ दिली.
दरम्यान लॅब्यूशेनने ४७ व्या षटकात १४५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्राखेर ५४ षटकात ३ बाद १५४ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून सध्या मार्नस लॅब्यूशेन ७३ धावांवर आणि मॅथ्यू वेड २७ धावांवर नाबाद खेळत आहे.
स्मिथ-लॅब्यूशेनने सांभाळला डाव –
डावाच्या १५ व्या षटकापर्यंत स्मिथ आणि लॅब्यूशेनने ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी काही शानदार फटके मारले तर कधी एकेरी -दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिले दोन झटपट धक्के बसल्यानंतरही सावरण्यास मदत झाली आहे. या दोघांनीही पहिल्या सत्राखेर त्यांच्या विकेट राखत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.
पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाने २७ षटकात २ बाद ६५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून या डावात स्मिथ ३० धावांवर आणि लॅब्यूशेन १९ धावांवर नाबाद खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर १० षटकांच्या आत तंबुत –
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही जोडी सलामीला फलंदाजी करायला उतरली. मात्र पहिल्याच षटकात वॉर्नर बाद झाला. त्याला सिराजने दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे वॉर्नर ४ चेंडूत १ धाव करुन बाद झाला. यानंतर मार्कस हॅरिसने मार्नस लॅब्यूशेनसह संघाचा डावा पुढे नेला. मात्र त्याला शार्दुल ठाकूरने ९ व्या षटकात झेलबाद केले. त्याचा झेल स्क्वेअर लेगला वॉशिंग्टन सुंदरने घेतला.
त्यामुळे दोन्ही सलामीवीर तंबूत लवकर परतल्याने स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेन ही जोडी मैदानावर आली. या दोघांनीही संघाचा डाव सांभाळला असून १५ षटकात ऑस्ट्रेलियाने २ बाद ३९ धावा केल्या आहेत. लॅब्यूशेन ८ धावांवर आणि स्मिथ १५ धावांवर नाबाद आहे.
भारताकडून २ खेळाडूंचे पदार्पण –
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताने ११ जणांच्या संघात ४ बदल केले आहेत. भारताचे आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी दुखापतीमुळे ११ जणांच्या संघातून बाहेर गेले आहेत. तर त्यांच्या जागेवर टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक अगरवाल यांना संधी मिळाली आहे. यांच्यापैकी टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर कसोटी पदार्पण करत आहेत.
तसेच ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाने दुखापतग्रस्त विल पुकोस्कीच्या जागेवर मार्कस हॅरिसला संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत –
शुभमन गिल, रोहित शर्मा(उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, मयंक अगरवाल, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया –
डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, टीम पेन (कर्णधार/यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड.