आयपीएल २०२० चा हंगाम नुकताच पार पडला. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचवण्यात प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मोलाची भूमिका बजावली. परंतु दिल्लीला या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पाँटिंग आता २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाला मार्गदर्शन करत आहे. अशामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने आपल्या यशाचे श्रेय पाँटिंगला दिले आहे.
योग्य मार्ग दाखवला
“त्यांनी माझी खूप मदत केली आणि मला योग्य मार्ग दाखवला. मी त्यांना काही दिवसांपासून ओळखतो. ते असे व्यक्ती नाहीत, जे फक्त बसून राहतील आणि तुम्हाला म्हणतील की ते तुम्हाला मार्ग दाखवतील. तसेच, तुमच्याशी चर्चा करतील. ते लोकांना बदलत नाहीत,” असे पाँटिंगबद्दल बोलताना स्टॉयनिसने शनिवारी (२१ नोव्हेंबर) म्हटले.
स्टॉयनिसने एक खेळाडू आणि पाँटिंगने एक प्रशिक्षक म्हणून दिल्ली संघाला पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. स्टॉयनिस म्हणाला, त्याला पाँटिंगकडून खूप पाठिंबा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. पाँटिंग यांची प्रशिक्षक म्हणून सर्वात चांगली बाब अशी की, ते तुमच्या खेळण्याच्या शैलीशी छेडछाड करत नाहीत.
खेळाडू म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही चांगले
तो म्हणाला, “ते केवळ एक खेळाडू म्हणूनच नाही, तर एक प्रशिक्षक म्हणूनही खूप चांगले आहेत. आपण सर्वांनी ऐकले आहे की, ते किती शानदार आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याला वैयक्तिकरीत्या ओळखता, तेव्हा तुम्हाला समजते की तो व्यक्ती चांगला का आहे. त्यांच्याकडून मिळणारा आत्मविश्वास आणि शिकवण ही खूप शानदार आहे.”
आयपीएल २०२०मधील कामगिरी
स्टॉयनिसने दिल्लीकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली. त्याने १७ सामने खेळताना २५.१४ च्या सरासरीने ३५२ धावा केल्या. सोबतच गोलंदाजीमध्ये त्याने २१.७६ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत.
२७ नोव्हेंबरपासून होणार भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात
येत्या २७ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बाऊचरचा खुलासा, ‘मला कोरोना झाल्याची कल्पनाच नव्हती’
…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा