टी20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022) मध्ये सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात ब्रिस्बेन येथे सामना झाला. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली जी बघून सर्व क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले. या सामन्याच्या वेळी उपस्थित असलेल्या समालोचकांनी देखील डोक्याला हात लावला.
विश्वचषकाच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला 42 धावांनी पराभूत केले. आयर्लंडच्या डावाच्या दरम्यान फलंदाजाकडून एक चेंडू हुकला आणि हा चेंडू सरळ स्टंप्सवर जाऊन लागला. परंतु एवढे होऊन देखील फलंदाज बाद झाला नाही. या सामन्यात आयर्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुड (Josh Hazlewood) संघासाठी पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्याचा चौथा चेंडू फलंदाज अँड्र्यू बलबर्नी (Andrew Balbirnie) हुलकावणी देत स्टंप्सच्या वरच्या भागाला लागला. हा चेंडू स्टंप्सला स्पर्ष करत यष्टीरक्षकाच्या हातात गेला.
या क्षणाला सर्वांनाच वाटले की फलंदाज बाद झाला आहे. सामन्याचे समालोचन करणाऱ्या समालोचकांना देखील हेच वाटत होते. मात्र , यष्टीरक्षक अपील करत असताना अचानक थांबला आणि फलंदाज बाद झाला नाही. हे पाहून सर्वच लोक आश्चर्यचकित झाले.
यानंतर जेव्हा रिप्ले बघण्यात आला तेव्हा समजले की चेंडूने स्टंप्सला स्पर्श नक्की केलेला मात्र स्टंप्सवरच्या बेल्स पडल्या नाही. आयसीसीच्या नियमांनुसार जर स्टंपवरच्या बेल्स पडल्या नाहीत तर फलंदाज बाद मानला जात नाही. या घटनेचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे.
याआधी, या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियातर्फे ऍरोन फिंच (Aaron Finch) याने धमाकेदार खेळी केली. या डावात त्याने 44 चेंडूत 63 धावा केल्या. निर्धारित 20 षटकात ऑस्ट्रेलियन संघाने धावफलकावर 179 धावा लावलेल्या.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडने त्यांचे सलामीवीर लवकर गमावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लॉर्कन टकर (Lorcan Tucker) याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि 48 चेंडूत 71 धावा केल्या. या धावा करण्यासाठी 9 चौकार आणि एका षटकार मारला. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने चांगला साथ मिळाला नाही आणि आयर्लंड हा सामना 42 धावांनी हरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भर दो झोली मेरी! टीम इंडियात निवड न झाल्याने पृथ्वी थेट साईबाबांच्या चरणी
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार