जगभरातील क्रिकेटप्रेमी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आजी-माजी दिग्गजांनी भविष्यवाणीचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श याच्या नावाचाही समावेश आहे. मिचेल मार्शचे विधान सध्या जोरदार चर्चेत आहे.
काय म्हणाला मार्श?
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया संघाच्या सुरुवातीविषयी बोलायचं झालं, तर त्यांना सलग 2 सामने गमवावे लागले होते. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी साखळी फेरीतील 7 आणि 1 उपांत्य सामना असे सलग 8 सामने जिंकले आहेत. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला त्यांनी 3 विकेट्सने पराभूत केले. मात्र, या विजयासाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
असे असूनही ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू मिचेल मार्श याचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. अंतिम सामन्यापूर्वी मिचेल मार्शची भविष्यवाणी सर्वांचे लक्ष वेधत आहे. मार्शने आतापर्यंत 9 सामन्यात 426 धावा केल्या आहेत. यामध्ये बांगलादेशविरुद्धच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच, तो उपांत्य सामन्यात खाते न खोलताच तंबूत परतला होता. मात्र, भारताविरुद्ध त्याने केलेले विधान कोट्यवधी भारतीयांना पचवणे खूपच कठीण आहे. त्याने भारतीय संघाला 65 धावांवर सर्वबाद करून ट्रॉफी जिंकण्याचे विधान केले आहे.
मिचेल मार्श याने दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 अंतिम सामन्याविषयी (India vs Australia World Cup Final) चर्चा केली. यावेळी तो म्हणाला, “अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलिया अजिंक्य राहील. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया 2 विकेट्स गमावत 450 धावा करेल. तसेच, भारतीय संघाला अवघ्या 65 धावांवर सर्वबाद करून ट्रॉफी उंचावेल.”
आता ऑस्ट्रेलियन खेळाडूचे हे विधान किती खरं ठरतंय, हे अहमदाबादमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यानंतरच समजेल. मात्र, त्याच्या या विधानाची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे. अशात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेणार नाही. मात्र, मार्शचे विधान खोटं ठरवण्यासाठी कडवी झुंज नक्की देईल. (aussie all rounder mitchell marsh said that australia will win the trophy by all out india for 65 runs in the final)
हेही वाचा-
‘त्या दीड तासादरम्यान मी खूपच घाबरलेलो, पण…’, INDvsNZ Semi Finalविषयी ‘थलायवा’ रजनीकांत काय म्हणाले?
Semi Final 2मध्ये 0 धावांचे योगदान देणाऱ्या बावुमाची पराभवानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे चरित्र…’