एॅडिलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९१ धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २४४ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना ५३ धावांची आघाडी मिळाली.
या डावात ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर सर्वबाद करण्यात भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. त्याने चार बळी घेत ऑस्ट्रेलियन डावाला खिंडार पाडले. त्याच्या याच कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर टीका केली. अश्विनला गृहीत धरणे महागात पडले, असे वक्तव्य पॉन्टिंगने केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या चॅनल 7 वर बोलताना रिकी पॉन्टिंग म्हणाला, “आर अश्विनला ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कमी लेखले. अश्विनच्या ताकदीचा अंदाज त्यांना आला नाही. त्यांनी अश्विन विरुध्द गरजेपेक्षा अधिक आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला.”
अश्विनसोबत आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून काम केलेल्या पॉन्टिंगने त्याची स्तुती केली. “ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अश्विनच्या गोलंदाजीवर धावांची लूट करण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विनने हा प्रयत्न हाणून पाडत आपला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला”, असे पॉन्टिंग म्हणाला.
भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज
ऑफस्पिनर आर अश्विनने पहिल्या डावात ४ बळी पटकावत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला हादरे दिले. ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव स्मिथसह ट्रॅविस हेड, कॅमेरॉन ग्रीन आणि नॅथन लॉयनला बाद करत अश्विनने भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक बळी घेतले. त्याने १८ षटकांत केवळ ५५ धावा देत हे ४ बळी घेतले. त्यामुळे भारतीय संघाला ५३ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
संबंधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– बुमराहला मिळाली विराट शाबासकी, हे होते कारण
– पृथ्वीचा पुन्हा एकदा फ्लॉप शो; दुसर्या डावातही ठरला अपयशी