ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. नुकतेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केल्याचे प्रकरण गाजले होते. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी होत सर्वांची मने जिंकली आहेत. याद्वारे त्याला दाखवून द्यायचे होते की, तो आणि त्यांचा पूर्ण संघ भारतीय खेळाडूंवर अशोभनीय टिप्पणी करण्याऱ्यांच्या विरोधात आहेत.
सोमवारी (११ जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना पार पडला. भारतीय खेळाडूंच्या शेवटच्या डावातील चिवट झुंजीमुळे सामना अनिर्णीत राहिला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे बुमराह आणि सिराज यांच्याबद्दल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली होती. त्यानंतरही सामन्याच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांमधून पुन्हा अशीच टीका सिराजवर करण्यात आली. अखेर स्टे़डियममधील ४-५ प्रेक्षकांना पोलिसांनी स्टेडियमबाहेर नेले. यादरम्यान जवळपास १० मिनिटे खेळ थांबला होता.
जेव्हा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून टीम पेन फलंदाजी करत होता. सामना संपल्यानंतर टीम पेनला याविषयी विचारले असता तो म्हणाला की, “ही खूप दु:खद गोष्ट आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ अशाप्रकारच्या व्यवहाराचे खासकरुन वर्णद्वेषी टीकेचे अजिबात समर्थन करत नाही. म्हणून मी खेळ थांबला असताना भारतीय संघासमवेत उभा राहिलो होतो. मी भारतीय संघाला एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही कुणीही प्रेक्षकांच्या भारतीय खेळाडूंसोबतच्या दुर्व्यवहाराचे समर्थन केले नाही.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्टेटमेंट
या प्रकरणाबाबत रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदन जाहीर केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले की, प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद टीकेला कधीही सहन करण्यात येणार नाही. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडक पावले उचलेल. याबरोबरच त्यांनी यजमान म्हणून भारतीय संघाची माफी मागितली असून अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेऊ असे सांगितले.
चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये होणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ३ सामने पार पडले आहेत. तिसरा सामना अनिर्णीत राहिल्याने मालिका १-१ ने बरोबरीवर आहे. अशात चौथा आणि शेवटचा सामना निर्णायक असेल. १५ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत हा सामना होणार आहे. ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्णद्वेषी टिप्पणी करणार्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी घालावी, माजी खेळाडूने केली मागणी