दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या कसोटीपासूनच खेळाडूंमध्ये वादविवाद पाहायला मिळाले आहेत. या वादाचे पडसाद चाहत्यांमध्येही उमटताना दिसून येत आहे.
न्यूलँड्सवर चालू असलेल्या द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसादरम्यान एका चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला डिवचले. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाले आहेत.
यावर अॉस्ट्रलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्याची ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबरची वागणूक “अपमानास्पद” असल्याचे म्हटले आहे. या वादाबद्दल ऑस्ट्रलियाने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडे अधिकृत तक्रारीचे पत्र दिले आहे.
या प्रकरणात झाले असे की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर ३० धावांवर बाद झाला, तेव्हा तो पॅव्हेलियनमध्ये परतताना द. आफ्रिकेच्या एका चाहत्यामध्ये आणि त्याच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली. या घटनेनंतर त्या चाहत्याला नंतर स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले होते.
याविषयी लेहमन म्हणाले. ” आपण खेळाडूंबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल वाईट बोलत आहोत. असे क्रिकेटच्या खेळामध्येच नाही तर हे कुठेही घडू नये. तुम्ही थट्टा मस्करी करा पण हे फारच झाले आहे.”
ते असेही म्हणाले, वॉर्नर हा एकच खेळाडू नाही की ज्याच्याबरोबर गैरवर्तन करण्यात आले. तसेच त्या गैरवर्तवणुकीचा स्थर खूप वाईट होता. याबाबद्दल लेहमन म्हणाले,” या कसोटी मालिकेत अनेक घटना घडल्या पण ही घटना सर्वात वाईट होती.”
त्याचबरोबर त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी हाशिम अमलाबरोबर केलेले गैरवर्तन चुकीचे होते हे देखील मान्य करताना याबद्दलही आपले मत व्यक्त केले.
ते म्हणाले की,” ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या दृष्टीने हे चांगले दिसले नाही. आम्हाला चांगला क्रिकेटचा खेळ पाहायचा आहे तसेच दोन्ही संघांना पाठिंबा द्यायचा आहे.”
या सर्व प्रकरणाबद्दल दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर आणि ग्रॅमी स्मिथ यांनीही ट्विटरवरून परखड मते व्यक्त केली आहेत. यात त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची व त्यांच्या देशवासियांनी दर्शवलेल्या विरोधांची आठवण करून दिली.
डर्बनमधील पहिल्या कसोटीदरम्यान वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकमध्ये झालेल्या वादा नंतरच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रलिया खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसऱ्या कसोटी दरम्यानही काही चाहत्यांनी डेव्हिड वॉर्नरला डिवचण्यासाठी सोनी बिल विल्यम्सचे मास्क घातले होते