टी-२० विश्वचषकात शनिवारी (६ नोव्हेंबर) वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने वेस्ट इंडीजचा पराभव केला. वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंसाठी हा त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. याच पार्श्वभूमिवर या सामन्याला एक भावनिक वळण मिळाले होते. वेस्ट इंडीजचे अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो आणि ख्रिस गेल या दोघांनी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. आता हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही.
ड्वेन ब्रावोने त्याच्या निवृत्तीची माहिती आधीच दिली होती. मात्र, गेलने अध्याप त्याच्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जे काही घडले त्यावरून स्पष्ट होते की, आता गेल वेस्ट इंडीज संघासाठी खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा गेलचा शेवटचा सामना होता आणि याच कारणास्तव कर्णधार कायरन पोलार्डने त्याला सामन्याच्या अंतिम टप्प्यात गोलंदाजी करण्याची संधी दिली. गेलनेही मिळालेल्या या संधीचा संघाला योग्य फायदा करून दिली.
कायरन पोलार्डने जेव्हा गेलला गोलंदाजीची संधी दिली, तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५ षटकांमध्ये अवघ्या ८ धावांची आवश्यकता होती. अशात गेल गोलंदाजी करण्यासाठी आला. गेलने या सामन्यातील त्याच्या पहिल्या षटकात आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल त्याच्या शेवटच्या चेंडूवर बळी घेतला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिचेल मार्श फलंदाजी करत होता. त्याने या चेंडूवर सरळ जेसन होल्डरच्या हातात झेल दिला.
जेव्हा होल्डरने मार्शचा झेल घेतला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त एक धावा आवश्यक होती. वेस्ट इंडीजने जवळपास सामना गमावला होता. मात्र, तरीही मार्शचा बळी घेतल्यावर गेलने असा जल्लोष केला, जसे की या बळीनंतर त्याचा संघ सामन्यात विजय मिळवणार आहे. गेलने विकेट घेतल्यानंतर ज्याप्रकारे आनंद साजरा केला ते पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.






