दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. जेतेपद मिळवण्यासाठी या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते, कारण दोन्ही संघांना अजून एकदाही जेतेपद मिळवता आले नाहीये. तत्पूर्वी पाहूया बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा टी२० विश्वचषकातील प्रवास.
असा राहिला आहे ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास
ऑस्ट्रेलिया संघ हा सर्वात बलाढ्य संघांपैकी एक आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेत अधिराज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकदाही जेतेपद मिळवता आले नाहीये. ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपद मिळवले होते.
इतर वर्षातील कामगिरी सांगायची झाल्यास, २००७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर २००९ मध्ये ग्रूप स्टेज, २०१२ मध्ये उपांत्यफेरी आणि २०१४, २०१६ मध्ये या संघाला सुपर १२ फेरीच्या पुढे जाता आले नव्हते.
ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ३५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना २१ सासम्यात विजय तर १४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यूझीलंडचा पहिल्यांदा टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात प्रवेश
तसेच न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. यापूर्वी न्यूझीलंड संघाने २००८ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण ३६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २० सामन्यात न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच २ सामने बरोबरीत सुटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतासाठी वाजली धोक्याची घंटा! जखमी कॉनवेच्या जागी ‘या’ धाकड अष्टपैलूची न्यूझीलंड संघात वर्णी
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा