जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला ऑस्ट्रेलिया संघाच्या रूपात नवीन चॅम्पियन मिळाला. ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी भारताला पराभवाचा मोठा धक्का दिला. भारतीय संघाचा 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी विजयाचे स्वप्नही भंगले. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफी झाली आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया असा संघ बनला, ज्यांनी आयसीसीच्या सर्व ट्रॉफी आपल्या नावावर केल्या.
भारताचा दुसरा डाव
ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघापुढे विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला दुसऱ्या डावात सर्व विकेट्स गमावत 234 धावाच करता आल्या. नेथन लायन (Nathan Lyon) याने 64व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची शेवटची विकेट घेतली. स्कॉट बोलँड याने सिराजचा झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी शानदार विजय मिळवला.
दुसऱ्या डावात भारताकडून फलंदाजी करताना विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. विराटने 78 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे (46), रोहित शर्मा (43), चेतेश्वर पुजारा (27) आणि केएस भरत (23) यांनाच 20 धावांचा आकडा पार करण्यात यश आले. इतर एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन लायन या फिरकीपटूने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त स्कॉट बोलँडने 3, मिचेल स्टार्कने 2 आणि कर्णधार पॅट कमिन्सने 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात 8 बाद 270 धावांवर डाव घोषित केला होता. यावेळी त्यांच्याकडून ऍलेक्स कॅरे याने सर्वाधिक नाबाद 66 धावा कुटल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्यूशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावांचे योगदान दिले. तसेच, स्टीव्ह स्मिथही 34 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज 30 धावांचा आकडा पार करू शकला नव्हता. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज याला 1 विकेट घेता आली.
पहिला डाव
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 469 धावांचा डोंगर उभारला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने 163, तर स्टीव्ह स्मिथ याने 121 धावा करत शतकी खेळी साकारली होती. त्यांच्याव्यतिरिक्त ऍलेक्स कॅरे (48) आणि डेविड वॉर्नर (43) यांनीही मोलाचे योगदान दिले होते. इतर एकही फलंदाज फार चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, स्मिथ आणि हेडच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मोठे आव्हान उभे केले. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजा याला 1 विकेटवर समाधान मानावे लागले.
ऑस्ट्रेलियाच्या 470 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 296 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी भारतीय सलामीवीर 30 धावांवर तंबूत परतले होते. यावेळी रोहित शर्मा (15) आणि शुबमन गिल (13) फार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पहिल्या डावात भारताकडून तीन फलंदाज चमकले. त्यात अजिंक्य रहाणे (89), शार्दुल ठाकूर (51) आणि रवींद्र जडेजा (48) यांचा समावेश होता. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडाही पार करू शकला नव्हता.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, नेथन लायन याला 1 विकेटवर समाधान मानावे लागले. (australia team won wtc final by 209 runs against team india)
महत्वाच्या बातम्या-
अनुष्काने ओव्हलवर येऊन केली चूक! विराटची विकेट पडताच अभिनेत्री जोरात ट्रोल
‘माझ्या मते कॅमरून ग्रीनने शानदार झेल पकडला’, वादग्रस्त निर्णयावर भारतीय दिग्गजाची खळबळजनक प्रतिक्रिया