आयपीएलमध्ये खेळत असलेले ऑस्ट्रेलिया संघांचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांच्यासह संघातील इतर काही स्टार खेळाडूंना भारतीय संघाविरुद्ध डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी लाल चेंडूने सराव करण्याची संधी मिळणार नाही, या आशंकेला ऑस्ट्रेलियाचा कसोटी सामन्यांचा कर्णधार टीम पेनने फेटाळून लावले आहे.
ऍडिलेडमध्ये सुरु होईल देशांतर्गत स्पर्धा
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, सलामीवीर डेविड वॉर्नर, वेगवान गोलंदाज कमिन्स, जोश हेझलवुड आणि जेम्स पॅटिन्सन हे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील नियमित खेळाडू सध्या युएईमध्ये असून आयपीएलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आयपीएलचा हा 13 वा हंगाम 10 नोव्हेंबरला संपणार आहे, तर ऑस्ट्रेलियाची देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा शेफील्ड शिल्ड या आठवड्याच्या शेवटी ऍडिलेडमध्ये सुरू होणार आहे.
शेफील्ड शील्ड स्पर्धेत खेळाडू घेऊ शकणार नाही भाग
“कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे परदेशातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या ऑस्ट्रेलियातिल खेळाडूंना भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी शेफील्ड शील्ड स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार नाही”, असे पेनने सांगितले
आयपीएलनंतर कसोटी सामने खेळण्यास येणार नाही अडचण
पुढे बोलताना तो म्हणाला “मर्यादित षटकांचे सामने खेळल्यानंतर कसोटी सामना खेळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. ऑस्ट्रेलिया संघांचे जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत ते याआधीही टी20 क्रिकेट खेळल्यानंतर लगेच कसोटी क्रिकेट खेळले आहे.”
भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार होता परंतु कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे सामना पुढे ढकलण्यात आला.