---Advertisement---

उत्कंठा शिगेला! तब्बल २१ महिन्यांनंतर भारत- ऑस्ट्रेलिया येणार आमने सामने, रोहितची कमतरता भासणार?

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 1:11 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वनडे मालिकेला शुक्रवारपासून (27 नोव्हेंबर) सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल.

भारतीय संघ 21 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर क्रिकेट सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 18 जानेवारी 2019 रोजी या दोन्ही संघात अखेरचा वनडे सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने जिंकली होती वनडे मालिका 

जानेवारी 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला होता. या मालिकेत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच होता.

रोहितच्या अनुपस्थितीमुळे पडेल फरक

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा वनडे संघाचा भाग नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला वनडे आणि टी20 संघात स्थान देण्यात आले नाही. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या 40 वनडे सामन्यात 2208 धावा केल्या आहेत. यात 8 शतके आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी पाहता भारतीय संघाला त्याची कमतरता भासेल.

कोहली-धवन यांच्यावर असेल अधिक जबाबदारी

रोहितच्या अनुपस्थितीत फलंदाजी विभागाची जबाबदारी अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीने 40 सामन्यात 1910 धावा केल्या आहेत, तर शिखर धवनने 27 सामन्यात 1145 धावा केल्या आहेत. याशिवाय मधल्या फळीत श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि हार्दिक पंड्या हे फलंदाज असतील.

कोण असेल भारतीय संघाची सलामी जोडी?

शिखर धवनसोबत दुसरा सलामीवीर कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या शर्यतीत मयंक अगरवाल आणि शुबमन गिल आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर केएल राहुलही अतिरिक्त पर्याय असेल.

बुमराह-शमी यांच्यावर असेल गोलंदाजी विभागाची जबाबदारी

भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर असेल. दोघांनीही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनाही उत्तम कामगिरी कामगिरी करावी लागेल.

वॉर्नर-स्मिथच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत
दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांचे पुनरागमन झाल्याने ऑस्ट्रेलिया संघ मजबूत झाला आहे. त्याचबरोबर आक्रमक फलंदाज फिंच आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हेदेखील भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतात.

स्टार्क-हेजलवुड यांच्यावर असेल गोलंदाजी विभागाची जवाबदारी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जॉश हेजलवूडसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज आहेत. हे गोलंदाज भारतीय संघाला आव्हान देण्यास सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये अधिक धोकादायक ठरतात. याशिवाय फिरकीपटू ऍडम झम्पा याच्याही कामगिरीवर लक्ष असेल.

हवामान अहवाल आणि खेळपट्टीबद्दल माहिती

सिडनीमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 24 आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. फिरकीपटू देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. सिडनी क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 56.05 % आहे.

सिडनी स्टेडियममधील आकडेवारी:

एकूण वनडे सामने खेळले: 177
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय: 88
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय: 62
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 222
दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या: 187

भारतीय वनडे संघ

विराट कोहली (कर्णधार), शुबमन गिल, शिखर धवन, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ

ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, मार्नस लॅब्यूशाने, मोइसेस हेनरिक, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉयनिस, कॅमरॉन ग्रीन, पॅट कमिन्स, सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, जॉश हेजलवूड, मिशेल स्टार्क, अँड्र्यू टाय आणि ऍडम झॅम्पा.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी पावर हीटिंग करू शकत नाही’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्याआधी भारताच्या स्टार फलंदाजाचे मोठे वक्तव्य

लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोलंबो किंग्ज-कँडी टस्कर्स आमने सामने, इरफानच्या कामगिरीवर लक्ष

ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---