ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यादरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) सुरुवात होणार आहे. मालिका सुरू होण्यास आणखी एका आठवडा शिल्लक असताना अनेक दिग्गज या मालिकेविषयी आपापली मते व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा आजवरचा सर्वात यशस्वी फिरकीपटू असलेल्या शेन वॉर्नने देखील आगामी मालिकेच्या संभाव्य विजेत्याचे नाव जाहीर केले आहे. वॉर्नने यासोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे देखील कौतुक केले.
हा संघ जिंकेल २-१ ने मालिका
ऑस्ट्रेलियाकडून ७०० पेक्षा अधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या वॉर्नला आगामी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा विजेता कोण असेल? असा प्रश्न विचारला असता वॉर्नने सांगितले, “आगामी मालिकेचा विजेता कोण? असा प्रश्न असेल तर मी उत्तर देईल ऑस्ट्रेलिया. भारताचा संघ चांगला आहे. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची अधिक संधी दिसते. ऑस्ट्रेलियाला घरगुती वातावरणाचा फायदा मिळेल. ऑस्ट्रेलियाकडे जास्त अनुभवी आणि मजबूत खेळाडू आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली मालिकेत फक्त एक कसोटी सामना खेळणार असल्याने, त्याचा परिणाम नक्कीच भारतीय संघाच्या कामगिरीवर होईल. मला वाटते ऑस्ट्रेलिया मालिकेवर २-१ ने कब्जा करेल.”
भारताचा कर्णधार विराट कोहली हा जानेवारी महिन्यात पिता बनू शकतो. विराटने कुटुंबासोबत राहण्यासाठी बीसीसीआयकडे पालकत्व रजेसाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज मंजूर झाल्याने तो मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परत येईल.
बीसीसीआयचे केले कौतुक
वॉर्नने आपल्या मुलाखतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे देखील कौतुक केले. वॉर्न म्हणाला, “बीसीसीआयने ज्याप्रकारे प्रथमश्रेणी क्रिकेटचे प्रारूप बनवले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय संघातील खेळाडू देशांतर्गत स्पर्धा खेळून, धावा बनवून पुन्हा देशासाठी खेळायला तयार होतात. आयपीएलमुळे देखील भरपूर फायदा झाला आहे. भारतीय संघ यावेळी जगातील सर्वोत्कृष्ट नाही, पण सर्वोत्तम संघांत नक्कीच आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १७ डिसेंबर पासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) सुरुवात होईल. मालिकेतील पहिली कसोटी ऍडलेड येथे दिवस-रात्र स्वरूपात खेळली जाईल. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर, पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल.
संबधित बातम्या:
– शेन वॉर्नने निवडली पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन, या खेळाडूंना दिले स्थान
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान