महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 5 गडी राखून पराभव झाला. मेगन स्कटने ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी केली. तिनं 5 विकेट घेऊन भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. मात्र संघ अवघ्या 100 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं 16.2 षटकांत सामना जिंकला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया आणि स्मृती मंधाना भारतासाठी सलामीला आल्या. मंधाना अवघ्या 8 धावा करून बाद झाली. तर प्रिया 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. हरलीन देओल 19 धावा करून आऊट झाली. तिनं 34 चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीतनं 17 धावांचं योगदान दिलं. जेमिमाह रॉड्रिग्जनं 42 चेंडूत 23 धावा केल्या. रिचा घोषलाही केवळ 14 धावा करता आल्या. अशाप्रकारे संपूर्ण संघ 100 धावांवर ऑलआऊट झाला.
मेगन स्कटनं ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी केली. तिनं 6.2 षटकात केवळ 19 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. तिनं 1 मेडन ओव्हरही टाकला. किम गर्थनं 8 षटकात 20 धावा देत 1 बळी घेतला. तर गार्डनर, सदरलँड आणि एलाना किंग यांनी 1-1 बळी घेतला.
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं 16.2 षटकांत 5 गडी गमावून विजय मिळवला. कांगारुंसाठी लिचफिल्ड आणि जॉर्जिया सलामीला आल्या. जॉर्जियानं नाबाद 46 धावा केल्या. तिनं 42 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. लिचफिल्डनं 35 धावा केल्या. बेथ मुनी आणि ॲलिस पेरी काही विशेष करू शकल्या नाहीत. दोघीही 1-1 धावा करून बाद झाल्या. गार्डनर 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
भारताकडून रेणुका सिंगनं चांगली गोलंदाजी केली. तिनं 7 षटकात 45 धावा देत 3 बळी घेतले. प्रिया मिश्रानंही शानदार गोलंदाजी केली. तिनं 2 षटकात 11 धावा देत 2 बळी घेतले.
हेही वाचा –
भुवीचं नाणं अजूनही खणखणीत वाजतंय! जबरदस्त हॅट्ट्रिकसह केली टीकाकारांची बोलती बंद
विनोद कांबळीच्या मदतीला आले वर्ल्ड कप विजेते स्टार, परंतु ही एक अट मान्य करावी लागेल!
IND VS AUS; यशस्वी जयस्वाल सोबत केएल राहुलच ओपनिंग करणार, स्वतः रोहित शर्माने केली पुष्टी!