भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर, दुसरा सामना शनिवारी (९ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ११९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १९.१ षटकांत ६ विकेट्स गमावत पूर्ण केला. आणि सामना जिंकला.
खरंतर ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी पहिल्याच षटकात एलिसा हेलीची विकेट गमावली होती. हेलीला शिखा पांडेने अफातून चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. तिच्या चेंडूला अनेकांनी शतकातील चेंडू म्हणून नावाजले.
तसेच ऑस्ट्रेलियाने १० षटकांपर्यंत ४६ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. पण, एकिकडे विकेट्स जात असताना दुसरी बाजू सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या बेथ मूनीने सांभाळली होती. पण १४ व्या षटकात राजेश्वरी गायकवाडने तिचाही अडथळा दूर केला होता. मूनीने ३४ धावांची खेळी केली. पण, नंतर ताहिला मॅकग्राने आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅकग्राने ३३ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या.
भारतीय महिला संघाकडून राजश्वरी गायकवाडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शिखा पांडे, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय महिला संघ मैदानात उतरला. पण संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय महिला संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या. पण, अखेर पुजा वस्त्राकरने झुंज देत २६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी केली आणि संघाला ११८ धावांपर्यंत मजल मारुन दिली.
पुजाव्यतिरिक्त या सामन्यात केवळ हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माला दोनआकडी धावसंख्या पार करता आली. कर्णधार हरमनप्रीत कौरने २८ धावांची खेळी केली. तर दीप्तीने १६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून तायला व्लामिंक आणि सोफी मोलिनेक्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ऍश्ले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम आणि निकोला कॅरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
आता ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि भारतीय महिला संघातील अखेरचा आणि तिसरा टी२० सामना १० ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.४० वाजता सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: सूर्यकुमारच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला!
भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण