आयसीसी महिला विश्वचषकातील १८वा सामना शनिवारी (१९ मार्च) ऑकलंड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला. महिला विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांतील भारताचा हा तिसरा पराभव होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचाही हा पाचवाच सामना होता. मात्र, त्यांनी आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं नाही.
सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ विकेट्स गमावत निर्धारित ५० षटकात २७७ धावा केल्या. भारताकडून मिळालेले २७८ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकात पूर्ण केले.
Australia complete the highest successful run-chase in ICC Women’s @cricketworldcup history 🎉 pic.twitter.com/9Cv2JLGja5
— ICC (@ICC) March 19, 2022
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक धावा ठोकल्या. तिने १०७ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. या धावा करताना तिने १३ चौकारांचा पाऊस पाडला. तिचे शतक जरी हुकले असले, तरीही तिने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. लॅनिंगव्यतिरिक्त यष्टीरक्षक एलिसा हेली (७२ धावा) आणि रचेल हेनस (४३ धावा) यांनीही चांगली खेळी केली. तसेच, एलिसा पेरीनेही २८ धावांची खेळी केली.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना पूजा वस्त्राकरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच, मेघना सिंग आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) सर्वाधिक धावा केल्या. तिने ९६ चेंडूंचा सामना करताना ६८ धावा ठोकल्या. या धावा करताना तिने १ षटकार आणि ४ चौकारही मारले. मितालीव्यतिरिक्त यास्तिका भाटिया (५९) आणि हरमनप्रीत कौरने (५७) धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच, पूजा वस्त्राकरनेही ३४ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही.
यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना डार्सी ब्राऊनने ३० धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या. तसेच, अलाना किंगने २, तर जेस जोनासनने १ विकेट खिशात घातली.
महिला विश्वचषकातील १९वा सामना रविवारी (२० मार्च) ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कूक अन् कोहलीला मागे सोडत रूटचा नाद खुळा विक्रम; थेट गाठले अव्वल स्थान
धोनीबद्दल काय आहेत भावना? गंभीर म्हणतोय, ‘१३८ कोटी लोकांसमोर सांगू शकतो की…’