मेलबर्न। बुधवारी(१७ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. त्याला उपांत्यपूर्व फेरीत ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे नदालचे यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
अटीतटीचा झालेला हा सामना त्सित्सिपासने ३-६,२-६, ७-६(४), ६-४, ७-५ अशा फरकाने ५ सेट खेळून जिंकला आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या २ सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर जिंकला सामना…
चार तास पाच मिनिटे चाललेल्या या सामन्यात त्सित्सिपास पहिले २ सेट पराभूत झाला होता. पण त्यानंतर त्याने रोमांचकारी झालेला तिसरा सेट ६-६ च्या बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये जिंकला आणि सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर मात्र, त्याने नदालला जोरदार प्रतिउत्तर देत खेळ केला. त्याने तिसऱ्या सेटनंतर नदालला त्याची सर्विस ब्रेक करण्याची एकही संधी दिली नाही.
अखेरच्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी झाली होती. पण त्सित्सिपासने नदालची सर्विस ब्रेक करत आघाडी मिळवली. या आघाडीचा फायदा घेत त्याने त्याच्या सर्विसवर पुढील गेमही जिंकत सामना आपल्या नावावर केला. तरी नदालने ३ मॅच पाँइंट वाचवले होते. पण अखेर त्सित्सिपासने अखेर हा सेटही जिंकत सामना जिंकला.
विशेष म्हणजे त्सित्सिपास हा केवळ दुसरा असा खेळाडू आहे ज्याने नदालला ग्रँडस्लॅममध्ये नदालविरुद्ध पहिले दोन सेट गमावल्यानंतर सामना जिंकला आहे. याआधी असा पराक्रम २०१५ सालच्या यूएस ओपनमध्ये फॅबिओ फॉगनीनीने केला होता. त्याने नदालविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये पराभूत झाल्यानंतरही सामना जिंकला होता.
माझे टेनिसच सर्वकाही सांगून गेले…
अविस्मरणीय विजय मिळवल्यानंतर त्सित्सिपास त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, ‘कोर्टवर आज जे काही झाले, त्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझे टेनिसनेच सर्वकाही सांगितले.’ तसेच तो म्हणाला, ‘ ही अविश्वसणीय भावना आहे. मी चांगली सुरुवात केली नव्हती. पण तिसऱ्या सेटमध्ये काय झाले माहित नाही. मी पक्षाप्रमाणे उडालो आणि ते माझ्यासाठी काम करुन गेले.’
नदालच्या पराभवाने नोव्हाक जोकोविचचे अव्वल स्थान कायम
नदालच्या पराभवामुळे ८ मार्चपर्यंत नोव्हाक जोकोविचच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिल, हे निश्चित झाले आहे.
त्सित्सिपाससमोर असेल डॅनिएल मेदवेदेवचे आव्हान
नदालला पराभूत करुन उपांत्यफेरीत पोहचलेल्या त्सित्सिपाससमोर आता रशियाच्या डॅनिएल मेदवेदेवचे आव्हान असेल. मेदवेदेवने उपांत्यपूर्व फेरीत अँड्रे रुब्लेवचा पराभव केला आहे आणि उपांत्यफेरीत प्रेवश केला आहे. याआधी मेदवेदेव आणि त्सित्सिपास ६ वेळा आमने-सामने आले असून मेदवेदेवने ५ सामने जिंकले आहेत आण त्सित्सिपासने १ सामना जिंकला आहे.