मेलबर्न । स्पेनचा राफेल नदाल हा ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे. त्याने मारिन चिलीचबरोबर चाललेल्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घेतली.
नदालने माघार घेतल्यामुळे चिलीचचा उपांत्य फेरीत सामना ब्रिटनच्या कायले एडमंड या खेळाडूशी होणार आहे. एडमंडने तृतीय मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
हा सामना चिलीचने ३-६, ६-३, ७-६, २-६, २-० असा जिंकला.
आजपर्यंत ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहास २६४ सामन्यात केवळ दुसऱ्यांदा दुखापतीमुळे चालू सामन्यातून माघार घेतली आहे. यापूर्वी २०१०च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतच अँडी मरेविरुद्ध नदालने चालू सामन्यातून माघार घेतली होती.
नदाल या सामन्यात पहिल्यांदा चांगलाच लयीत दिसत होता. त्यामुळे त्याने पहिला सेट ६-३ असा जिंकला. परंतु तिसरा सेट जिंकत २०१४च्या अमेरिकन ओपन विजेत्या चिलीचने आपण एवढ्या सहजासहजी सामना सोडणार नाही हे दाखवून दिले.
त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली परंतु अनुभवी नदालने यात बाजी मारली.
चौथ्या सेटमध्ये नदालच्या दुखापतीने डोके वर काढले आणि तो हा सेट पराभूत झाला. शेवटच्या सेटमध्ये नदालला अखेर २-० असे पिछाडीवर असताना माघार घ्यावी लागली.