आयपीएल 2021 स्पर्धेला कोरोना व्हायरसचा फटका बसला. ही स्पर्धा 29 सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जर ही स्पर्धा पुढे पूर्ण होईल की नाही हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तसेच खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाचे काय, त्यांना पूर्ण वेतन मिळणार का, याबद्दलही चर्चा सुरु झाल्या. पण आता असे समजत आहे की ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांचे पूर्ण वेतन मिळेल.
आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाली असली तरी डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव स्मिथ अशा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूर्ण मोबदला मिळू शकतो. विविध विमा योजनांमुळे आयपीएल स्पर्धा रद्द झाली तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूर्ण रक्कम मिळणार आहे. आयपीएलच्या विविध फ्रेंचायझींनी त्यांच्या बर्याच खेळाडूंबाबत ही तरतूद केलेली आहे.
आयपीएल रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सुमारे 18 दशलक्ष डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा आहे. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचारी मालदीव मार्गे ऑस्ट्रेलियात परतणार आहेत. सर्वांना सुखरुप ऑस्ट्रेलियात परत आणण्याच्या योजनेवर ऑस्ट्रेलियन सरकार आणि क्रिकेट बोर्ड काम करत आहेत. ऑस्ट्रेलियाची सीमा 15 मेपासून सुरू होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल संघ खेळाडूंना घरी परतण्यासाठी चार्टर्ड विमानांची सुविधा देत आहेत.
टी-20 विश्वचषकापूर्वी आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. यावर्षी टी 20 विश्वचषक भारतात होणार आहे. भारतव्यतिरिक्त इंग्लंड आणि युएई देखील आयपीएल स्पर्धेचे संभाव्य ठिकाण म्हणून पुढे येत आहेत. तरी देखील सप्टेंबरमध्ये उर्वरित आयपीएल सामने आयोजित करणे बीसीसीआयला सोपे जाणार नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले आहे की, आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळण्यास उपलब्ध होणार नाहीत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या खेळाडूंचीही खेळण्याची शक्यता कमीच आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडे सध्या सप्टेंबरमध्ये वेळ शिल्लक आहे, परंतु पुढील काही दिवसांत त्यांच्या योजनांमध्येही बदल होऊ शकतात.
फ्यूचर टूर्स प्रोग्राम (एफटीपी) नुसार टी20 विश्वचषक होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेचे मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवेल. त्यापूर्वी जून-जुलै मध्ये ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. दरम्यान हे जाणून घेणे गरजेचे आहे की अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसनसारखे खेळाडू विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये येणार नाहीत, कारण त्यांनी स्वत: आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टीव स्मिथला मिळणार ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद? टीम पेनने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
‘हे’ आहेत जगातील सर्वात जास्त मानधन घेणारे क्रिकेटपटू; पहिल्या पाच जणांत नाही विराट
झाला का घोटाळा? माईक हसीची ऑस्ट्रेलियाला जाण्याची वाट बसली अवघड होऊन