ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅलिसा हिली हिने आपल्या शानदार क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर ती सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला क्रिकेटमधील एका प्रभावी आणि ऐतिहासिक अध्यायाचा शेवट होत आहे.
अॅलिसा हिलीने ही माहिती ‘विलो टॉक’ या पॉडकास्टवर खास मुलाखतीत शेअर केली. लवकरच ती सिडनी येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या संपूर्ण प्रवासावर भाष्य करणार आहे. निवृत्तीच्या निर्णयामागील भावना व्यक्त करताना हिली म्हणाली, “हा निर्णय मी बराच काळ मनात ठेवला होता. सातत्याने होणाऱ्या दुखापती, शरीरावरचा ताण आणि मानसिक थकवा जाणवू लागला होता. पुन्हा पुन्हा त्या पातळीवर झेप घेणं दिवसेंदिवस कठीण होत गेलं.”
भारताविरुद्ध घरच्या मैदानावर कारकीर्द संपवण्याचा निर्णय खास असल्याचंही तिने नमूद केलं. “भारताविरुद्धची मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मायदेशात शेवटचा सामना खेळणं ही माझ्यासाठी सर्वोत्तम समाप्ती ठरेल,” असं हिलीने सांगितलं. यामुळे ती आगामी टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नाही, हेही तिने स्पष्ट केलं.
टी-20 विश्वचषकासाठी संघाला तयार होण्याची संधी मिळावी, यासाठी वेळेत निर्णय जाहीर करणं आवश्यक होतं, असंही हिलीने नमूद केलं. “मी ही घोषणा टाळायची होती, पण विश्वचषकाच्या तयारीसाठी संघात बदल गरजेचे असल्याने निर्णय सार्वजनिक करावा लागला. गेल्या सहा महिन्यांपासून हा विचार मनात होता आणि आता तो व्यक्त केल्याने मनाला शांती मिळाली आहे,” असं ती म्हणाली.
अॅलिसा हिलीने 2010 मध्ये अवघ्या 19व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तिने वनडेमध्ये 3500 हून अधिक, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि 2023 असे सहा टी-20 विश्वचषक, तसेच 2013 आणि 2022 चे वनडे विश्वचषक जिंकले.
अॅलिसा हिली केवळ एक यशस्वी कर्णधारच नव्हे, तर महिला क्रिकेटच्या जागतिक विकासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व म्हणून कायम लक्षात राहील.






