भारताचा स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. शनिवारी (६ ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत साबळेने ८:११:२० अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. मागील सहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिन्ही पदके ही केवळ केनियन खेळाडू जिंकत होते. अविनाशने हे रौप्य पदक जिंकत त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.
What a race! Inspirations are made out of these moments.
Unstoppable @avinash3000m wins a 🥈 for Team 🇮🇳 , breaks the #nationalrecord and the 🇰🇪 domination in the Men’s 3000 M Steeplechase.#EkIndiaTeamIndia #weareteamindia
@birminghamcg2022. pic.twitter.com/zg2zZQ0M33— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2022
अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकताना वैयक्तिक विक्रम, राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळे सुवर्णपदकाच्या अगदी जवळ होता आणि तो केनियाच्या इब्राहिम किबिवोटपेक्षा सेकंदाच्या पाचव्या भागाने मागे पडला. किबीवोटने ८:११:१५ अशी वेळ नोंदवली. अविनाशच्या रौप्य पदकापूर्वी मागील सहा राष्ट्रकुल स्पर्धेतील म्हणजेच मागील २४ वर्षातील स्टीपलचेसमधील सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके ही केनियाच्याच खेळाडूंनी जिंकली होती.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारताने ऍथलेटीक्समध्ये आतापर्यंत ४ पदके जिंकली आहेत. साबळेपूर्वी तेजस्वीन शंकरने उंच उडीत कांस्यपदक जिंकले. मुरली श्रीशंकरने लांब उडीत रौप्यपदक पटकावले. प्रियांका गोस्वामीने १०,००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले आहे.
अविनाश हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या मांडवा गावचा रहिवासी आहे. लहानपणी अत्यंत कष्टातून त्याने धावण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे सैन्यात भरती झाल्यानंतर तो भारतासाठी अनेक स्पर्धांमध्ये चमकला. त्याने यापूर्वी तब्बल ९ वेळा आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. मागील वर्षी टोकियो ऑलिंपिकमध्ये तो अगदी थोड्या फरकाने अंतिम फेरीसाठी पात्र होण्यापासून राहिला होता. मात्र, त्यावेळी आलेले अपयश त्याने यावेळी भरून काढले. आता त्याच्याकडून आशियाई खेळ तसेच ऑलम्पिकमध्ये भारताला अपेक्षा असतील.
महत्त्वाच्या बातम्या-