Suryakumar Yadav Captaincy :- भारतीय क्रिकेट संघाला 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. टी20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेटच्या या स्वरूपातून निवृत्त झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्त्वाची कमान सोपवण्यात आली आहे. नवखा कर्णधार सूर्यकुमारच्या निवडीमुळे भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे आहे?, याबाबत आता फिरकीपटू अक्षर पटेल याने मोठे वक्तव्य केले आहे.
ESPNcricinfo शी बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, “मी सूर्यकुमारसोबत बराच वेळ घालवला आहे. सूर्याभाई आनंदी व्यक्ती आहे. तो संघातील वातावरण खेळीमेळीचे ठेवतो. त्याला इतरांची नक्कल करायला आणि मजेदार गोष्टी करायला आवडते. मला खात्री आहे, तो संघातील वातावरण शांत ठेवेल.”
अक्षर पटेल गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग होता. तो म्हणाला की, सूर्या गोलंदाजांना भरपूर स्वातंत्र्य देतो. अक्षरला आशा आहे की, आता सूर्यकुमारने पूर्णवेळ टी20 कर्णधारपद स्वीकारले आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही.
अक्षर पुढे म्हणाला की, “सूर्यकुमार कर्णधार असताना मी नुकतीच पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. तो गोलंदाजांना सहकार्य करणारा कर्णधार आहे. गोलंदाजांना ते मागतो तसे क्षेत्ररक्षण लावून देतो. माझ्याबाबतीतही असेच होते. या सर्व गोष्टीत फारसा बदल होईल असे वाटत नाही. आता त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याची मानसिकता जाणून घेणार आहोत. एका दौऱ्यातून तुम्ही कुणाच्या कर्णधारपदाचा न्याय करू शकत नाही. जेव्हा आम्ही त्याच्या नेतृत्त्वाखाली अधिक सामने खेळू; तेव्हा आम्हाला त्याच्या कर्णधार शैलीबद्दल अधिक माहिती मिळेल.”
दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेची सुरुवात 27 आणि 28 जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामने पल्लेकल्ले स्टेडियमवर होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने विश्वचषक खेळू नये, तो बेशुद्ध पडेल; माजी भारतीय क्रिकेटरनेच ‘हिटमॅन’ला हिणवले!
टीम इंडियापासून वेगळे होताच राहुल द्रविडला मिळाली मोठी जबाबदारी, आता या भूमिकेत दिसणार
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!