भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टी20 सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. स्फोटक फलंदाज ईशान किशन दुखापतीमुळे चौथा सामना खेळू शकलेला नाही, तर त्याच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला संघात संधी देण्यात आली आहे.
नाणेफेकीनंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने उपकर्णधार अक्षर पटेलच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट दिले. “अक्षरला अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे पुढील सामन्यात तो खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे,” असे सूर्या म्हणाला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी करण्यामागचे कारणही स्पष्ट केले. “काल येथे दव पडली होती आणि आजही हवेत दमटपणा आहे. त्यामुळे आम्ही आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,” असे त्याने सांगितले. सूर्यकुमारने हेही स्पष्ट केले की, ईशान किशनला निगल झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनर याने टॉसनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघातही एक बदल करण्यात आला असून काइल जेमिसनच्या जागी जॅक फोक्स याला संधी देण्यात आली आहे.
भारताने या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत आधीच 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे आणि मालिका आपल्या नावावर केली आहे. दरम्यान, नागपूरमध्ये पहिल्या टी20 सामन्यात बोटाला दुखापत झाल्यानंतर अक्षर पटेलने मंगळवारी सराव सत्रात कोणत्याही अडचणीशिवाय गोलंदाजी केली. याबाबत सहाय्यक प्रशिक्षक मोर्केल यांनी सांगितले की, “अक्षर कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो. त्याचा योग्य वापर कसा करायचा, हे आम्हाला ठाऊक आहे.”
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.
टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, मिचेल सॅंटनर (कर्णधार), जॅक फोक्स, मॅट हेन्री, जेकब डफी, इश सोढी.






