पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझमने छोट्या कालावधीत चांगली प्रगती केली आहे. तो पाकिस्तान संघाचा नियमित सदस्यही बनला आहे. त्याच्या मागील काही दिवसांमधील कामगिरीमुळे त्याची भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर तुलनाही होत असते. पण आझमनेच तो विराटला पाहुन शिकत असल्याचे आणि विराट त्याचा आदर्श असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात उद्या(16 जून) 2019 विश्वचषकातील 22 वा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी विराटबद्दल पत्रकारांशी बोलताना आझम म्हणाला, ‘मी त्याची फलंदाजी तसेच तो विविध परिस्थितीत ज्याप्रकारे फलंदाजी करतो ते पाहतो आणि त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.’
‘मी अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करतो. ही माझी शिकण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी माझे 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो.’
‘विराटची जिंकण्याची सरासरी उच्च आहे. त्यामुळे मी ती गाठण्याचाही प्रयत्न करतो.’
तसेच 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाने पाकिस्तान संघाला आत्मविश्वास मिळाला असल्याचेही आझमने सांगितले आहे.
आझम म्हणाला, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयाने आम्हाला विश्वास दिला आणि इथेही त्याची मदत होईल. कारण संघ सारखाच आहे आणि तो विजय एक प्रेरणा होता.’
2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने-सामने आले होते. या स्पर्धेतील पहिला सामना या दोन संघातच झाला होता. पहिल्या सामन्यात भारताने 124 धावांनी विजय मिळवला होता. तर अंतिम सामनाही या दोन संघातच पार पडला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीचेही विजेतेपद मिळवले होते.
अंतिम सामन्यातील या विजयाबद्दल सांगताना आझम म्हणाला, ‘तो विजय कधीही विस्मृतीत जाणार नाही आणि तो विजय एक मोठी प्रेरणा होती.’
भारत-पाकिस्तान या सामन्याकडे जगभरातून सर्वांचेच लक्ष असते. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दबाव असतो. याबद्दल बोलताना आझम म्हणाला, ‘आम्ही या सामन्याची चांगली तयारी केली आहे. कारण भारत आणि पाकिस्तान सामने रोमांचक असतात आणि मागणी असणारे असतात. तसेच या सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष असते.’
त्याचबरोबर आझम पुढे म्हणाला, ‘संपूर्ण संघ(पाकिस्तान संघ) भारताच्या विरुद्धच्या सामन्यासाठी सकारात्मक आहे. फक्त मीच नाही तर सर्व खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याची इच्छा आहे.’
तसेच भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाबद्दल आझम म्हणाला, ‘शंकाच नाही की भारताकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. पण आम्ही इंग्लंड विरुद्ध चांगले खेळलो आहे. त्यांच्याकडेही चांगले वेगवान आक्रमण आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही भारताचे वेगवान आक्रमण चांगल्याप्रकारे हताळू.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तूम्ही धोनीचे मोठे फॅन असाल तर इथे मिळेल मोफत जेवण!
–…म्हणून रवी शास्त्रींनी ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीमधून दाखवली धोनीची जर्सी
–इंग्लंडच्या जो रुटने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी