दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी, वैयक्तिकदृष्ट्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी हा सामना खास ठरला आहे. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या बाबर आझमने ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत २५०० धावा पूर्ण केल्या. त्याने या धावा ६२ डावात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने हा विक्रम करताना भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटने ६८ डावात ही कामगिरी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंच आहे.
पहिल्याच टी२० विश्वचषकात बाबार आझम चमकला
बाबरसाठी हा पहिलाच टी२० विश्वचषक होता. त्याने या स्पर्धेत खेळताना ६ सामन्यांत ३०३ धावा केल्या. तो पहिल्याच टी२० विश्वचषक स्पर्धेत ३०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पहिल्या टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर होता. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकात २६५ धावा केल्या होत्या. या यादीत त्या पाठोपाठ जो रुट असून त्याने २०१६ साली २४९ धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारे क्रिकेटर –
६२ डाव – बाबर आझम
६८ डाव – विराट कोहली
७८ डाव – ऍरॉन फिंच
८३ डाव – मार्टिन गप्टील
८९ डाव – पॉल स्टर्लिंग
पाकिस्तानचा पराभव
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून बाबर आझम व्यतिरिक्त मोहम्मद रिझवानने ६७ धावांची आणि फखर जमानने ५५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ४९ धावांची खेळी केली. तसेच अखेरच्या ५ षटकांत धूवांधार फलंदाजी करणाऱ्या मार्कस स्टॉयनिसने नाबाद ४० आणि मॅथ्यू वेडने नाबाद ४१ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
खिलाडूवृत्ती! स्टार्कचा खतरनाक बाउंसर रिझवानच्या हेल्मेटवर आदळताच ऍरॉन फिंचने केली मन जिंकणारी कृती
पराभव पचेना! पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल हारला आणि दु:खात चाहता दुबईच्या मैदानातच झोपला