येत्या २८ ऑगस्ट रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील पहिला सामना खेळणार आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिलाच सामना असेल. दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून बंद आहे. आयसीसी स्पर्धेतच या दोन संघांमध्ये स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते आशिया चषकात होणाऱ्या या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या सामन्याबद्दल पाकिस्तानी कर्णधार बाबार आझमने एक महत्वाचे विधान केले आहे.
नेदरलँड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, “युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत विरुद्ध तीन सामने झाल्यास पाकिस्तान टीम इंडियाचा क्लीन स्वीप करू शकेल का?” यावर बाबर म्हणाला की, “दबाव नाहीये. हा क्रिकेटचा सामना देखील एखाद्या सामान्य सामन्यासारखा खेळण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही यापेक्षा जास्त विचार करत नाही.” विशेष म्हणजे गेल्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने दुबईतच भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. टी-२० विश्वचषकातील भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय ठरला होता.
आम्ही फक्त आमच्या खेळाचा विचार करतो: बाबर
बाबर आझमने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारतावर मिळवलेल्या विजयाबाबत सांगितले की, “पाकिस्तान संघ आशिया कपमध्ये याच विचाराने प्रवेश करेल आणि फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करेल. दबाव वेगळा असेल, पण गेल्या विश्वचषकात आम्ही दबावाला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. यावेळीही आम्ही तसाच प्रयत्न करू. एक संघ म्हणून आमचा आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. परिणाम काहीही असो, सर्वोत्तम कामगिरी करणे आपल्या हातात आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, जर आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी दिली तर निकालही अनुकूल होतील.”
भारत गतविजेता आहे
चार वर्षांपूर्वी झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले होते आणि दोन्ही सामने भारताने जिंकले होते. तेव्हा पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही, अन्यथा दोन्ही देशांत तीन सामने झाले असते. २०१८च्या आशिया कप फायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी झाला होता. त्यानंतर भारताने हा सामना ३ गडी राखून जिंकला आणि ७व्यांदा आशिया चषकावर कब्जा केला होता.
दरम्यान, यंदाच्या वर्षी होणारा आशिया चषाचा हा १५वा हंगाम आहे. यापैकी भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया चषकाचे विजेतेपद भुषविले आहे. त्यानंतर श्रीलंकने सर्वाधिक ४ तर पाकिस्तान संघाला २वेळी आशिया चषकात विजेतेपद मिळवता आले आहे. शिवाय विशेष बाब म्हणजे आजवर युएईमध्ये एकुण ३वेळा आशिया चषकाचे यजमानपद गेले आहे. या तिनही वेळी टीम इंडियाने आशिया चषक आपल्या नावे केला आहे. यंदाच्या वर्षीही भारत आशिया चषकात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल. आणि गेल्या २ हंगामात मिळवलेले जेतेपद राखत विजयाची हॅट्रिक करेल अशी आशा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोलार्ड, ब्रावो पुन्हा एकत्र! मुबंईची फ्रॅंचायजी असणाऱ्या ‘या’ संघात सामील
झिम्बाब्वे दौऱ्यावर बीसीसीआयचा ‘हा’ एक डाव पडू शकतो भारी, गमवावी लागेल वनडे मालिका!
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान






