सायना नेहवालच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात, बीजेपीत झाला प्रवेश

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. पण आता तिचा राजकारणातही प्रवेश झाला आहे. तिने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तिला भाजप कार्यालयात भाजपचे सदस्यत्व देण्यात आले. यावेळी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग उपस्थित होते.

हरियाणामध्ये जन्म झालेल्या सायनाने यावेळी म्हटले की ‘मी भारतासाठी पदके जिंकली आहेत. मी खूप मेहनती आहे आणि मला मेहनती लोक आवडतात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशासाठी खूप काही करताना पाहत आहे. मला त्यांच्याबरोबर देशासाठी काहीतरी करायचे आहे.’

सायनासह तिची मोठी बहिण चंद्राशू हिनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

29 वर्षीय सायनाने ऑलिंपिक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत पदके मिळवली आहेत. तिने 2012 च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच 2015 मध्ये सायना जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल क्रमांकावरही विराजमान झाली होती. त्यावेळी अव्वल क्रमांकावर पोहचणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली होती.

त्याचबरोबर सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 विजेतीपदे मिळवली आहेत.  ती सध्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर आहे.

सायनाच्या आधी भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबीता फोगाट आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर हे देखील भाजप पक्षात सामील झाले आहेत.

You might also like