सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत केवळ 186 धावा केल्या होत्या. मात्र, भारताच्या युवा गोलंदाजांनी बांगलादेशचे नऊ बळी मिळेपर्यंत दमदार गोलंदाजी केली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांना शेवटचा बळी न मिळाल्याने बांगलादेशने एक गडी राखून विजय मिळवला. मेहदी हसन मिराज हा बांगलादेशच्या विजयाचा नायक ठरला.
https://twitter.com/ICC/status/1599400233871482889?t=qLzEgOTkAddNR6PZliFXyg&s=19
नाणेफेक जिंकल्यानंतर यजमान संघाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवात निराशजनक झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) लवकर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील 31 चेंडूत 27 धावा करत माघारी परतला. 15 षटकांच्या आतच भारताने आपले 4 गडी गमावले होते. शाकिबने एकाच षटकात विराट आणि रोहितला बाद केले होते. मधल्या फळीत फंलदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केेला. पण श्रेयस अय्यर 24 धावा करत बाद झाला. केएल राहुलने एकाकी झुंज दिली. राहुलने भारतासाठी सर्वाधिक 73 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाचा डाव 186 धावांवर गडगडला. बांगलादेश संघासाठी शाकिब अल हसन याने 36 धावा देत 5 गडी बाद केले.
या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर शंतो याच्या रूपाने झटका बसला. कर्णधार लिटन दासने 41 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शाकिब (29) व रहीम (18) यांना सुरुवात मिळाली मात्र ते याचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकले नाहीत. त्यानंतरचे फलंदाज हे उपयुक्त योगदान देऊ शकले नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव 9 बाद 136 असा संकटात सापडला होता. मात्र, त्यानंतर मेहदी हसन याने एक अविस्मरणीय खेळी केली. मुस्तफिजुर रहमानला साथीला घेत त्याने बांगलादेशला सामन्यात जिवंत ठेवले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत बांगलादेशला विजयी केले. मिराजने नाबाद 41 धावांची खेळी केली. भारतासाठी मोहम्मद सिराजने सर्वाधिक तीन तर कुलदीप सेन वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (7 डिसेंबर) खेळला जाईल.
(Bangladesh Beat India By One Wicket In First ODI)