श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारी (01 सप्टेंबर) आशिया चषक 2022मधील पाचवा साखळी फेरी सामना रंगणार आहे. हा सामना दोन्हीही संघांसाठी करा अथवा मरा सामना असेल. कारण दोन्हीही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. त्यामुळे आता सुपर-4 फेरीत पोहोचण्यासाठी या संघांना विजय अत्यावश्यक आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होईल. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच श्रीलंका आणि बांगलादेश संघाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याच्या एका विधानामुळे हे वाकयुद्ध सुरू झाले आहे. शनाकाने सुरुवातीला बांगलादेश संघाकडे केवळ 2 विश्वस्तरीय गोलंदाज असल्याचे म्हटले होते. ज्यावर आता बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी (Bangladesh Coach Khaled Mahmud) पलटवार केल्याने हा वाद वाढला आहे.
27 ऑगस्टला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेला 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार शनाका म्हणाला होता की, “अफगाणिस्तानकडे विश्वस्तरीय गोलंदाजी आक्रमण आहे. आम्हाला माहिती आहे की, मुस्तफिजुर रेहमान चांगला गोलंदाज आहे आणि शाकिब अल हसनदेखील विश्वस्तरीय गोलंदाज आहे. परंतु या दोघांव्यतिरिक्त संघात कोणीही विश्वस्तरीय गोलंदाज नाही. त्यामुळे जर आम्ही अफगाणिस्तानची तुलना बांगलादेशशी केली, तर त्यांच्याविरुद्ध (बांगलादेश) जास्त प्रतिस्पर्धा पाहायला नसेल.”
थोडक्यात शनाकाने त्याच्या विधानाद्वारे बांगलादेशला कमी लेखले आहे. आता श्रीलंका आणि बांगलादेश संघांचा आमना सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला बांगलादेशचे प्रशिक्षक खालिद महमूद यांनी शनाकाला प्रत्युत्तर दिले आहे.
बांगलादेशचे प्रशिक्षक म्हणाले की, “मला नाही माहिती शनाकाने असे वक्तव्य का केले. निश्चितपणे अफगाणिस्तान एक चांगला संघ आहे. त्याने म्हटले की, आमच्याकडे फक्त 2 विश्वस्तरीय गोलंदाज आहेत. परंतु मला श्रीलंका संघात तर एकही गोलंदाज दिसत नाही. कमीत कमी बांगलादेशकडे मुस्तफिजुर आणि शाकिबसारखे विश्वस्तरीय गोलंदाज तरी आहेत. त्यांच्याजवळ तर तेही नाहीत. खरे तर शब्दांना नव्हे तर मैदानावरील प्रदर्शन महत्त्वाचे असते.”
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार