ढाका| ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी (०६ ऑगस्ट) या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. यजमान बांगलादेशच्या खेळाडूंनी पुन्हा चमकदार खेळ दाखवत १० धावांनी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. यासह बांगलादेशने टी२० सामना विजयाची हॅट्रिक नोंदवत मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पुढील चौथा टी२० सामना शनिवारी होणार आहे.
असा झाला सामना
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून कर्णधार महमुदुल्लाहने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. ५३ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्य केली. तसेच अष्टपैलू शाकिब अल हसननेही २६ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे बांगलादेशने २० षटकअखेर ९ विकेट्स गमावत १२७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणवीर नाथन एलिसने हॅट्रिक घेण्याची अविस्मरणीय कामगिरी केली. अखेरच्या २० व्या षटकात त्याने कर्णधार महमुदुल्लाह, मेहदी हसन आणि मुस्तफिजुर रेहमान यांच्या विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवुड आणि ऍडम झम्पा यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.
बांगलादेशच्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच षटकात कर्णधार मॅथ्यू वेडची विकेट गमावली. सलामी फलंदाज बेन मॅकडरमटही ३५ धावांवर बाद झाला. मिचेल मार्शने ४७ चेंडूत ५१ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु बांगलादेशचा गोलंदाज शोरिफुल इस्लामने मोहम्मद नईमच्या हातून त्याला झेलबाद करत संघाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाचा संघ डावाखेर ४ विकेट्सच्या मोबदल्यात ११७ धावाच करू शकला. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशने रचला इतिहास
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला बांगलादेशमध्ये क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला आहे. दुसरीकडे बांगलादेशने सलग ३ टी२० सामने जिंकत मालिकाही खिशात घातली आणि इतिहासही रचला आहे. आजवरच्या इतिहासात बांगालादेशने क्रिकेटच्या कोणत्याही स्वरुपात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणती मालिका जिंकली नोंदवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आम्ही मान्य करतो की पंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे,’ विरोधी संघाच्या अव्वल गोलंदाजाकडून स्तुती
‘ट्विटर डर गया’! ब्लू टीक परत येताच फॉर्ममध्ये आले धोनीचे चाहते, कमेंट्सचा पाडला पाऊस
अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ