सिलहेट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुधवारी (२० मे) बांगलादेशने पाकिस्तानचा ७८ धावांनी मोठा पराभव केला आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. ही कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२७ चा भाग असून बांगलादेशने जिंकताच या स्पर्धेच्या क्रमवारीत भारताला मागे टाकले आहे.
या विजयामुळे बांगलादेशची टक्केवारी ५८.३३ झाली असून ते आता क्रमवारीत पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. भारताची टक्केवाकी ४८.१५ असून संघ आता सहाव्या स्थानी आहे. यामध्ये भारताने खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले असून तेवढेच सामने गमावले आहेत. एका सामना ड्रॉ झाला. बांगालदेशची कामगिरी पाहिली तर त्यांनी ४ सामने खेळताना २ जिंकले, एक गमावला आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्याची स्थिती पाहिली तर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात लिटन दासच्या १२६ धावांच्या जोरावर २७८ धावसंख्या केली, बाकी राहिलेले एकही फलंदाज ३० पेक्षा अधिक धावा करू शकले नाही. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने ४, मोहम्मद अब्बासने ३ आणि हसन अलीने २ विकेट्स घेतल्या. तसेच पाकिस्तानचा पहिला डाव २३२ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यामध्ये त्यांच्याकडून सर्वाधिक धावा बाबर आझमने केल्या. त्याने ६८ धावांची खेळी केली. तसेच बांगलादेशकडून नाहिद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. मेहेदि हसन आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांगलादेशने ४६ धावांची आघाडी घेतली.
बांगलादेशने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी केली आणि ३९० धावा केल्या. त्यामध्ये मुशफिकुर रहिमने बांगलादेशकडून विक्रमी शतकी खेळी केली. त्याने २३३ चेंडूत १३७ धावा केल्या आणि तो बांगलादेशचा कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे मोठे लक्ष्य असताना त्यांची सुरूवात मात्र चांगली झाली नाही आणि त्यांनी ३५८ धावा केल्या.
मायदेशात पाकिस्तानला कसोटी मालिकेत व्हाईट-वॉश देण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. या पराभवामुळे पाकिस्तान कसोटी चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत आठव्या स्थानी घसरला आहे.






