आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) मागणीला नकार देत स्पर्धेतील बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवले जाणार नसल्याचा ठाम निर्णय घेतला आहे. हा निर्णय बुधवार, 21 जानेवारी रोजी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत घेण्यात आला. भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेदरम्यान सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती.
आयसीसीने स्पष्ट केलं आहे की, सर्व सुरक्षा यंत्रणांच्या सखोल तपासणीनंतर आणि स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन अहवालांचा विचार केल्यानंतर भारतातील कोणत्याही स्पर्धास्थळी बांगलादेशच्या खेळाडूंना, अधिकाऱ्यांना, माध्यम प्रतिनिधींना किंवा चाहत्यांना कोणताही धोका नसल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सामने स्थलांतरित करण्याचं कोणतंही ठोस कारण नसल्याचं आयसीसीने म्हटलं आहे.
आयसीसीने हेही नमूद केलं की, स्पर्धा सुरू होण्याच्या इतक्या जवळ वेळापत्रकात बदल करणे व्यवहार्य नाही. कोणताही विश्वासार्ह सुरक्षा धोका नसताना वेळापत्रक बदलल्यास भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी धोकादायक पायंडा पडू शकतो. यामुळे आयसीसीची जागतिक क्रिकेट नियामक संस्था म्हणून असलेली तटस्थता आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.
या वादावर तोडगा काढण्यासाठी आयसीसी व्यवस्थापनाने बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत सातत्याने पत्रव्यवहार आणि बैठका घेतल्या. या चर्चांदरम्यान स्पर्धेसाठी आखलेली सविस्तर सुरक्षा योजना, केंद्र आणि राज्य पातळीवरील कायदा व सुव्यवस्था यंत्रणांचा बहुस्तरीय बंदोबस्त याबाबतची संपूर्ण माहिती बीसीबीला देण्यात आली होती.
आयसीसीच्या प्रवक्त्याने या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “गेल्या काही आठवड्यांपासून आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संवाद साधला. स्वतंत्र सुरक्षा अहवाल, प्रत्येक मैदानासाठी आखलेली सुरक्षा व्यवस्था आणि यजमान प्रशासनाकडून मिळालेल्या अधिकृत हमी या सर्व बाबींमध्ये बांगलादेश संघासाठी कोणताही प्रत्यक्ष किंवा पडताळता येईल असा धोका आढळलेला नाही.”
प्रवक्त्याने पुढे सांगितलं की, बीसीबीने आपल्या भूमिकेत बदल न करता एका वेगळ्या आणि असंबंधित मुद्द्याशी स्पर्धेतील सहभाग जोडला, ज्याचा या स्पर्धेच्या सुरक्षेशी काहीही संबंध नाही. आयसीसीने स्पष्ट केलं की, सर्व 20 सहभागी देशांसाठी नियम समान आहेत आणि कोणत्याही एका संघासाठी अपवाद करता येणार नाही.






