येत्या मार्च महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असलेल्या बांग्लादेशच्या संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी या संघाची घोषणा करण्यात आली. बांग्लादेशने या मालिकेसाठी एकूण २० सदस्यीय संघ निवडला आहे. अव्वल अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन पालकत्व रजेमुळे या दौऱ्यात संघाचा भाग नसेल.
याशिवाय या संघात मोसद्दिक हुसेन, मोहम्मद नईम, नसुम अहमद आणि अल अमिन हुसेन यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच डावखुरा फिरकीपटू तईजुल इस्लामलाही संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत तो संघाचा भाग होता, मात्र त्याला अंतिम अकराच्या संघात संधी मिळाली नव्हती. त्याने मार्च २०२० मध्ये झिम्बावेविरुद्ध आपला शेवटचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता.
त्याचप्रमाणे मोसाद्दिक हुसेननेही नोव्हेंबर २०१९ मध्ये भारताविरुद्ध आपला शेवटचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता. बांग्लादेशने मधल्या फळीतील फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज म्हणून त्याचा संघात समावेश केला आहे. या संघात स्थान मिळालेला मोहम्मद नईम एक सलामी फलंदाज असून २०१९ साली भारतातील मालिकेने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या संघात वेगवान गोलंदाज अल अमिन हुसेन देखील पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आहे. मार्च २०२० मध्ये झिम्बावेविरुद्ध खेळलेल्या मालिकेपूर्वी तब्बल पाच वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून गायब होता.
दरम्यान, या न्यूझीलंड दौऱ्यावर बांग्लादेशचा संघ तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोरोना विषाणूमुळे या दौऱ्याच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले. मात्र अखेर येत्या २४ फेब्रुवारीला बांग्लादेशचा संघ न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यातील तीन वनडे सामने अनुक्रमे २०, २३ आणि २६ मार्चला डुनेडिन, ख्राईस्टचर्च आणि वेलिंग्टन येथे खेळवले जातील. तर तीन टी-२० सामने अनुक्रमे २८, ३० मार्च आणि १ एप्रिल रोजी हॅमिल्टन, नेपियर आणि ऑकलँड येथे पार पडतील.
बांग्लादेशचा संपूर्ण संघ-
तमीम इकबाल, मोसद्दिक हुसेन, नजमुल हुसैन शंटो, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, महमूदुल्लाह, अफिफ हुसैन, सौम्य सरकार, मोहम्मद नईम, तस्कीन अहमद, अल-अमीन हुसेन, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, मेहदी हसन, रुबेल होसैन, मेहदी हसन, नसुम अहमद.
महत्वाच्या बातम्या: