---Advertisement---

बाबर आझमच्या पुनरागमनामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही; बांगलादेशी खेळाडूने बाबरला दाखवला आरसा!

On: शुक्रवार, मे 15, 2026 8:05 PM
---Advertisement---

बांगलादेश आणि पाकिस्तान (BAN vs PAK) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 16 मे पासून सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने 104 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे आता पाकिस्तान आपली प्रतिष्ठा वाचवू शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तानसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिला सामना न खेळू शकलेला माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) आता पूर्णपणे तंदुरुस्त असून या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

बाबर आझमच्या पुनरागमनाबाबत बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने असे विधान केले ज्यामुळे बाबरची एकप्रकारे ‘बेइज्जती’ झाली आहे. रहीम म्हणाला, बाबर सारखा जागतिक दर्जाचा खेळाडू संघात असणे ही पाकिस्तानसाठी चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या येण्याने आमच्या संघाला काहीच फरक पडत नाही. कारण आम्ही जेव्हा पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने क्लीन स्वीप केले होते, तेव्हा बाबर आझम दोन्ही सामन्यांत खेळत होता.

पाकिस्तानचे नवे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनी बाबरच्या तंदुरुस्तीची पुष्टी केली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, पहिल्या सामन्यातील निकालामुळे आम्ही निराश होतो, पण आता ती जुनी गोष्ट झाली आहे. मला खात्री आहे की आम्ही या सामन्यात जोरदार पुनरागमन करू. हवामानाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पाऊस पडणे आपल्या हातात नाही, पण खेळण्याची संधी मिळाली तर आम्ही नक्कीच दर्जेदार क्रिकेट खेळू.

दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेशच्या संघात एक बदल निश्चित आहे. सलामीवीर शादमन इस्लाम छातीच्या दुखापतीमुळे बाहेर झाला असून, त्याच्या जागी तन्जीद हसन तमीम याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. खेळाव्यतिरिक्त दोन्ही संघांना पावसाचे मोठे आव्हान असणार आहे. याबाबत बोलताना मुशफिकुर रहीम म्हणाला की, सध्या खेळपट्टीपेक्षा हवामान हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---