वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला गेला. धरमशाला येथे पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशने 6 विकेट्सने विजय मिळवला. मेहिदी हसन मिराज या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने संघासाठी दोन्ही विभागात शानदार अष्टपैलू कामगिरी केली. या विजयासह बांगलादेशने स्पर्धेची जबरदस्त सुरुवात केली.
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय संघाच्या इतर खेळाडूंनी एकदम बरोबर असल्याचे सिद्ध केले. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाच्या फलंदाजांचा बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. यावेळी अवघ्या 37.2 षटकात त्यांचा डाव 156 धावांवर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. हे आव्हान बांगलादेशने 34.4 षटकात 4 विकेट्स गमावत 158 धावा करून पार केले. तसेच, 6 विकेट्सने सामना खिशात घातला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1710609379752558685
बांगलादेशची विजयी सलामी
यावेळी बांगलादेशकडून फलंदाजी करताना नजमुल होसेन शांतो याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 83 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्यात 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त मेहिदी हसन मिराज याने 73 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यात 5 चौकारांचा समावेश होता. तसेच, शाकिब अल हसनने 14 आणि लिटन दास यानेही 13 धावांचे योगदान दिले. सलामीवीर तंजीद हसन अवघ्या 5 धावांवर बाद झाला होता.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना फजलहक फारूकी, अझमतुल्लाह ओमरजाई आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.
अफगाणिस्तानकडून एकानेही केले नाही अर्धशतक
अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 62 चेंडूंचा सामना करताना 47 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. इब्राहिम जादरान आणि अझमतुल्लाह ओमरजाई यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. तसेच, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) फक्त 18 धावांवर बाद झाला. रहमत शाह यानेही कर्णधाराइतक्याच 18 धावा केल्या, तर अष्टपैलू राशिद खान याला 9 धावांवर विकेट गमवावी लागली.
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मेहिदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट नावावर केल्या. हसनने 9 षटकात 25 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या, तर शाकिबने 8 षटकात 30 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त शोरिफुल इस्लाम याने 2 विकेट्स घेतल्या, तर तस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रहमान यांनीही प्रत्येकी 1 विकेट्स नावावर केल्या.
बांगलादेशचा पुढील सामना 10 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना धरमशाला मैदानावरच खेळला जाणार आहे. (Bangladesh won by 6 wkts against afghanistan cwc 23)
हेही वाचा-
‘एक पराभव आमचं काहीही…’, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव होताच इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराचे बडेबोल
“मला लाज वाटतेय…”, बीसीसीआयच्या वर्ल्डकप आयोजनावर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया





