आज (29 ऑगस्ट) 26 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू विल पुकोव्स्कीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलनेही काही तासांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. तसेच भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननेही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होऊन फार काळ लोटलेला नाही. दरम्यान, टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. बरिंदर सरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात घोषणा केली आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बरिंदर सरनने गुरुवारी (29 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो अनेक वर्षे संघाबाहेर होता. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. त्याने भारताकडून 6 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले होते. बरिंदर सरनने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने आपला प्रवास सांगितला. तसेच प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
बरिंदर सरनने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना, मी कृतज्ञ अंतःकरणाने माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो. 2009 मध्ये बॉक्सिंगमधून स्विच केल्यापासून, क्रिकेटने मला असंख्य आणि अविश्वसनीय अनुभव दिले आहेत. वेगवान गोलंदाजी हे लवकरच माझे भाग्यशाली आकर्षण बनले आणि आयपीएल फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवाजे उघडले, शेवटी 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च सन्मान मिळाला.’
View this post on Instagram
त्याने लिहिले की, ‘माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी लहान असली तरी त्या काळात बनलेल्या आठवणी कायमच जपल्या जातील. माझ्या संपूर्ण प्रवासात मला योग्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापन देणाऱ्या देवाची मी सदैव ऋणी आहे. मी हा नवीन अध्याय सुरू करत असताना, क्रिकेटने मला दिलेल्या संधींबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. शेवटी म्हटल्याप्रमाणे, “आकाशाप्रमाणे स्वप्नांनाही मर्यादा नसतात”, म्हणून स्वप्न पाहत राहा.’
हेही वाचा –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड