भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हा सध्या तमिळनाडू येथे बूची बाबू निमंत्रित स्पर्धेत झारखंड संघासाठी खेळत आहे. या स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करताना त्याने शतक देखील ठोकले. सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या ईशान याला या कामगिरीनंतरही संघात पुनरागमन करणे अशक्य असल्याचे, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने म्हटले आहे.
ईशान किशनने नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर ईशानची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली. मात्र, त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ब्रेक दरम्यान ईशानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. ज्याकडे त्याने दुर्लक्ष केले. यानंतर ईशानलाही केंद्रीय करार गमवावा लागला.
आता बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ईशान किशनबद्दल सांगितले की, “ईशानने आयपीएलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण, ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही संधी नाही. खरे तर चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो भारतीय संघात पुन्हा खेळण्याची शक्यता कमी दिसते. पाहूया आपण पुढे काय होते.”
ईशान हा एक यष्टीरक्षक फलंदाज आहे जो भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आतापर्यंत 2 कसोटी, 27 वनडे आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 78 धावा केल्या. याशिवाय, त्याने वनडे सामन्यांत 42.40 च्या सरासरीने 933 धावा आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25.67 च्या सरासरीने आणि 124.37 च्या स्ट्राईक रेटने 796 धावा केल्या आहेत.
ईशान हा सध्या बुची बाबू स्पर्धेत खेळतोय. त्याचबरोबर, 5 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेत देखील तो खेळताना दिसेल. या दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होईल. त्या मालिकेत रिषभ पंत व केएल राहुल संघाचे मुख्य यष्टीरक्षक असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू