जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिल रोजी सुरुवात होईल. कोरोनाच्याच सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवली जात आहे. असे असले तरी, चाहत्यांमधील उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
चाहते पुन्हा एकदा मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहण्यास उत्सुक आहेत. या चौकार-षटकारातून अनेक तगडे फलंदाज शतके ठोकत असतात. मात्र, आयपीएलच्या इतिहासात ६ वेळा अशी घटना घडली आहे की, फलंदाज ९९ धावांवर बाद झाला आहे किंवा नाबाद राहिला आहे. तर, आपण याच ६ खेळ्यांविषयी जाणून घेऊया.
सुरेश रैना
‘मिस्टर आयपीएल’ नावानी ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैनाच्या नशिबी सर्वप्रथम ९९ धावांवर नाबाद राहण्याची नामुष्की ओढवली होती. २०१३ आयपीएलदरम्यान सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या साखळी सामन्यात चेन्नईला विजयासाठी ३ धावांची तर, रैनाला ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी रैनाने मारलेला फटका चौकारापार गेला आणि रैना ९९ धावांवर नाबाद राहिला.
विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा पहिला फलंदाज आहे. २०१३ आयपीएलमध्येच तोदेखील ९९ धावांवर बाद झाला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५७ चेंडूत ९८ धावा बनविल्या होत्या. मात्र, शतकासाठी दोन धावा हव्या असताना त्याचा साथीदार एबी डिव्हिलियर्स आणि त्याच्यात संभाषणाचा अभाव राहिल्याने विराट दुर्दैवीरित्या चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ९९ धावांवर बाद झाला.
ख्रिस गेल
‘युनिव्हर्स बॉस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या नावे आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ६ शतके आहेत. मात्र, त्याचा हा आकडा ८ पर्यंत जाऊ शकला असता. गेल आयपीएल प्रत्येकी एकदा ९९ धावांवर बाद आणि नाबाद राहिला आहे.
गेल सर्वप्रथम २०१९ मध्ये आपला पूर्वाश्रमीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना ९९ धावांवर नाबाद राहिलेला. पंजाब प्रथम फलंदाजी करत असताना डावाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर गेलकडे स्ट्राइक होती. त्यावेळी गेल ९५ धावांवर नाबाद होता. मोहम्मद सिराजच्या विसाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने चौकार खेचला मात्र अखेरच्या चेंडूवर तो एकही धाव घेण्यात यशस्वी झाला नाही.
त्याचप्रमाणे, गेल २०२० आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ९९ धावांवर बाद झाला होता. यावेळी राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याचा त्रिफळा उडविलेला.
पृथ्वी शॉ
दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हादेखिल या यादीमध्ये समाविष्ट आहे. शॉ २०१९ आयपीएल मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय दृष्टिक्षेपात असताना अवसानघातकी फटका खेळून ९९ धावांवर बाद झाला होता. पुढे, हा सामना सुपर ओवरमध्ये गेला आणि दिल्लीसाठी कगिसो रबाडाने अप्रतिम गोलंदाजी करत सामना जिंकून दिला.
इशान किशन
या यादीमध्ये अखेरचे नाव मुंबई इंडियन्सचा युवा यष्टीरक्षक इशान किशनचे आहे. इशानला २०२० आयपीएलमध्ये सौरभ तिवारी अचानक दुखापतग्रस्त झाल्याने संघात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, त्या सामन्यात त्याने ९९ धावांची तुफानी खेळी केली. संघाला विजयासाठी २ चेंडूत ५ धावांची गरज असताना तो ९९ धावांवर बाद झाला. परंतु, अखेरच्या चेंडूवर पोलार्डने चौकार वसूल करत सामना सुपर ओवरमध्ये नेला. दुर्दैवाने या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल इतिहासातील चार सर्वोच्च वैयक्तिक खेळी, नाबाद १७५ धावांसह ‘हा’ धुरंधर अव्वलस्थानी
हिटमॅनचा कारनामा! आयपीएलमधील ‘हे’ दोन भन्नाट विक्रम करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू