---Advertisement---

अरेरे..! स्टीव्ह स्मिथकडून भर मैदानात बाबर आझमची बेइज्जती, VIDEO VIRAL

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 8:34 PM
---Advertisement---

बिग बॅश लीगमध्ये (BBL) यंदा पाकिस्तानच्या फलंदाजांना वारंवार अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद रिझवानला सामन्यादरम्यान रिटायर्ड आउट करण्यात आलं होतं, तर आता पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथसोबत वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात झालेल्या बिग बॅश लीगमधील 37व्या सामन्यात हा प्रकार पाहायला मिळाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने 5 विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. मात्र सामना जिंकण्याइतकाच बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील मैदानावरील तणाव चर्चेचा विषय ठरला.

सामन्यादरम्यान सिडनी थंडरची फलंदाजी सुरू असताना, डेव्हिड वॉर्नरच्या एका फटक्यावर फिल्डिंग करताना बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात गैरसमज झाला. दोघेही चेंडूकडे धावले, मात्र कोणाचाही स्पष्ट निर्णय न झाल्याने चेंडू थेट सीमारेषेबाहेर गेला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं की बाबर आझम तो झेल सहज पकडू शकला असता. बाबरची ही चूक पाहून स्मिथ चांगलाच नाराज झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. काही वेळाने असाच एक प्रसंग घडला, पण यावेळी स्मिथने बाबरकडे दुर्लक्ष करत स्वतः झेल घेतला.

सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सकडून स्टीव्ह स्मिथ आणि बाबर आझम यांनी सलामी दिली. मात्र बाबर पुन्हा एकदा धावांसाठी झगडताना दिसला. 11व्या षटकात क्रिस ग्रीनच्या अखेरच्या चेंडूवर बाबरने लॉन्ग ऑनकडे फटका मारत धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण स्टीव्ह स्मिथने स्पष्टपणे धाव घेण्यास नकार दिला.

षटक संपल्यानंतर बाबर आणि स्मिथ यांच्यात काही संवाद झाला. स्मिथच्या उत्तरामुळे बाबर स्पष्टपणे नाराज आणि चिडलेला दिसत होता. बाबरने 39 चेंडूत 47 धावा (7 चौकार) केल्या, मात्र नाथन मॅकअँड्र्यूच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला.

यानंतर मात्र स्टीव्ह स्मिथने एकहाती सामना फिरवला. स्मिथने अवघ्या 42 चेंडूत शतक झळकावत बिग बॅश इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक साकारली. या डावात एका षटकात 32 धावा काढण्याचाही पराक्रम त्याने केला, जो BBL इतिहासातील सर्वात महागडा षटक ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---