आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील दुसरा क्वालिफायरचा सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो १५ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर,१७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाकिब अल हसनची बांगलादेश संघात निवड झाली आहे. शाकिब अल हसनने आयपीएल स्पर्धा खेळायचा निर्णय घेतल्यामुळे त्याला पहिला सराव सामना खेळता आला नव्हता. तर १४ ऑक्टोबर रोजी आयर्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात देखील तो उपलब्ध नसणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ जर अंतिम सामन्यात पोहोचला तर, शाकिब अल हसन खेळणार की नाही याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्ड घेणार आहे. २ सराव सामने झाल्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी बांगलादेश संघाचा सामना स्कॉटलंड संघासोबत होणार आहे. जर बांगलादेश क्रिकेट बोर्डने शाकिब अल हसनला अंतिम सामना खेळण्याची संधी दिली तर, त्याला आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेच दुबई वरून मस्कतला जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा व्यस्त कार्यक्रम पाहून संघ व्यवस्थापक त्याला विश्रांती देऊ शकतात.
बांगलादेश क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी मंगळवारी (१२ ऑक्टोबर) क्रिकबजला म्हटले की, “आम्ही आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर नंतर टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी शाकिब अल हसनच्या पुनरागमनाबाबत निर्णय घेऊ. आम्हाला भरपूर गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. जर कोलकाता नाईट रायडर्स संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर त्याला विश्रांती करण्यासाठी किती वेळ मिळणार आहे.”
बांगलादेश संघ सध्या सुपर १२ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेश संघाचे १७ ऑक्टोबरनंतर पात्रता फेरीतील पुढील सामने १९ ऑक्टोबर रोजी ओमान आणि २१ ऑक्टोबर रोजी पापुआ न्यू गिनी सोबत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एका झेलासाठी तीन क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, तरी फलंदाजाला मिळाला षटकार, पाहा मजेशीर व्हिडिओ
केकेआरच्या यशाचा सूत्रधार नसणार विश्वचषक संघाचा भाग! कर्णधारानेच दाखवला अविश्वास