---Advertisement---

आधी वाढलेलं वजन कमी कर, मग निवडीचा विचार करू; बीसीसीआयचा ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला इशारा

On: रविवार, मे 9, 2021 8:22 AM
Prithvi Shaw and Mayank Agarwal
---Advertisement---

बीसीसीआयने शुक्रवारी (७ मे) आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघ निवडकर्त्यांनी मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या अधिकतर खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

परंतु सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या, आयपीएल २०२१ स्पर्धेत आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आले नाहीये. त्याला संघात स्थान का देण्यात आले नाही? याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्राने मोठा खुलासा केला आहे.

पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात ८०० हून अधिक धावा कुटल्या होत्या. हाच फॉर्म कायम राखत तो आयपीएल २०२१ मध्ये झळकला होता. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना अवघ्या ८ सामन्यात त्याने ३०८ धावा चोपल्या होत्या. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ८२ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे. त्याचा हा उल्लेखनीय फॉर्म पाहता त्याला भारतीय कसोटी संघात जागा मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु संघ निवडकर्त्यांनी त्याची निवड केली नाही.

या कारणामुळे संघात मिळाले नाही स्थान
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “पृथ्वी शॉ अवघ्या २१ वर्षांचा आहे. परंतु तो मैदानावर खूप संथ आहे. त्याला काही किलो वजन कमी करावे लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये देखील क्षेत्ररक्षण करताना त्याच्या एकाग्रतेत कमतरता जाणवली होती. पृथ्वी शॉने ऑस्ट्रेलियावरून परतल्यानंतर खूप मेहनत घेतली आहे.”

रिषभ पंतचे दिले उदाहरण 
त्यांनी रिषभ पंतचे उदाहरण देत म्हटले की, “जर रिषभ पंत काही गोष्टींमध्ये काही महिन्यातच बदल घडवून आणू शकतो, तर पृथ्वी शॉदेखील करु शकतो. हे पहिल्यांदा नाहीये की, कुठल्या खेळाडूला असे करण्यास सांगितले जात आहे. रिषभ पंतला देखील वजन जास्त असल्यामुळे अनेक टिकांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि आता तो तीनही प्रकारात संघातील प्रमुख खेळाडू आहे.”

अशीच कामगिरी करावी लागेल
तसेच ते पुढे म्हणाले की, “पृथ्वीला आणखी काही स्पर्धांमध्ये अशीच कामगिरी सुरू ठेवावी लागणार आहे. त्याला नेहमी एका स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे संघात स्थान दिले जाते. त्यानंतर तो साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरतो. तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला जास्तवेळ संघाबाहेर ठेवता येणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

गर्लफ्रेंडच्या जबराट डान्सने पुन्हा एकदा पाडली पृथ्वी शॉची विकेट; प्रतिक्रिया देत म्हणाला, ‘कातिलाना’

आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू

लढाई कोरोनाविरुद्धची! चेन्नई सुपर किंग्सने केला मदतीचा हात पुढे; तमिळनाडूतील कोविड रुग्णांसाठी दिले ‘हे’ योगदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---