---Advertisement---

‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ 

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 3:13 PM
---Advertisement---

दुखापतींचे ग्रहण मानगुटीवर बसलेला भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यात प्रमुख खेळाडूंना बाहेर बसवत नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरला होता. मालिका १-१ ने बरोबरीवर असल्याने यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारत संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणे निश्चित होते. अगदी अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी ब्रिस्बेनच्या मैदानावर झालेल्या या निर्णायक सामन्यात चिवट झुंज दिली. परंतु भारतीय खेळाडूंच्या जबरदस्त प्रदर्शनापुढे शेवटी ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले आणि भारताने ३ विकेट्सने सामन्यासह मालिकाही खिशात घातली.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर चोहोबाजूंनी त्यांची प्रशंसा होत आहे. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने ‘अजिंक्यसेना’च्या कामगिरीचे मोठे बक्षिस देत विशेष कौतुक केले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “बीसीसीआयने भारतीय संघासाठी ५ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. हा भारतीय क्रिकेटमधील काही निवडक आणि विशेष क्षणांपैकी एक क्षण आहे. भारतीय संघाने उत्तम खेळ आणि उत्तम कौशल्य दाखवले आहे.”

असा झाला थरारक ब्रिस्बेन कसोटी सामना

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रिस्बेन टेस्ट : भारताकडून यजमान ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत! सामन्यासह २-१ च्या फरकाने ऐतिहासिक मालिका विजय

ब्रिस्बेन टेस्ट : ऐतिहासिक विजयासह भारताने कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लावला सुरुंग, वाचा

‘लढवय्या’ चेतेश्वर पुजारा! ‘या’ संकटांचा सामना करत भारतीय संघाची एका बाजूने लढवली खिंड, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---