भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना अखेर १४ वर्षांनंंतर पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळाली आहे. प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगच्या आरोपानुसार ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांची बंदी २००५ मध्ये संपली होती. बीसीसीआयने प्रभाकर यांची थकबाकी आता मंजूर केली आहे. यामध्ये पेन्शन, बेनवोलेंट फंड (परोपकारी निधी) आणि एकरकमी लाभ यांचा समावेश आहे.
प्रभाकर (Manoj Prabhakar) यांना बीसीसीआयकडून (BCCI) एकूण १ कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनची (Mohammed Azharuddin) थकबाकीदेखील मंजूर केली होती. त्याला १.५ कोटी रुपये मिळाले होते.
माध्यमांतील काही वृत्तापत्रानुसार, देशांतर्गत खेळाडूंना प्राईझ मनी (बक्षीसाची रक्कम) मिळालेली नाही. ४ महिन्यांपूर्वी पुरस्काराची घोषणा झाली होती. बीसीसीआयने ती थकबाकीदेखील मंजूर केली आहे. यामध्ये २ पुरुष खेळाडूंना २.५ लाख रुपये मिळाले. त्यात सिक्कीमचा मिलींद कुमार (रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा) आणि बिहारचा कर्णधार आशुतोष अमन (रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स) यांचा समावेश आहे.
महिला खेळाडूंमध्ये भारतीय संघाची स्टार सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माला (Shafali Verma) ज्यूनियर क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू निवडले होते. तर दीप्ती शर्माला देशांतर्गत स्पर्धेतील अनुभवी खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. या दोन्ही महिला क्रिकेटपटूंना प्रत्येकी १.५ लाख रुपये दिले आहेत.
याव्यतिरिक्त ६ पुरुष खेळाडूंना १.५ लाख रुपये मिळाले आहेत. यामध्ये पाँडिचेरीचे सिदाक सिंग (२३ वर्षाखालील सीके नायडू ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स), झारखंंडचा आर्यन हुडा (१६ वर्षांखालील विजय मर्चंट स्पर्धेत सर्वाधिक धावा), झारखंडचा अभिषेक यादव (विजय मर्चंट स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स), गुजरातचा मनन हिनराजिया (२३ वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीत सर्वाधिक धावा), गजरातचा अपूर्व आनंद (१९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स) आणि केरळचा वत्सल गोविंद (१९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत सर्वाधिक धावा) या खेळाडूंचा समावेश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ड्रीम ११ अनेक पाहिल्या असतील, पण रोहित- विराटला घेऊन केलेली अशी ड्रीम ११ नक्कीच नाही
-बीसीसीआयनंतर गांगुलीची ‘दादागिरी’ चालणार आयसीसीसीत?
-एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स