भारतीय क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. सर्वत्र विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि बीसीसीआय याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. परंतु या सर्व घडामोडींमध्ये बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. या अधिकाऱ्याचे नाव अभिजीत साळवी आहे, जे बीसीसीआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजेच सीएमओ होते. साळवी मागच्या दहा वर्षांपासून बीसीसीआयसोबत काम करत होते. पण आता त्यांनी भारतीय संघासोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भामुळे साळवी यांचे काम देखील वाढले होते आणि या कामातून विश्रांती घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी साळवी यांनी वैयक्तित कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला आहे. साळवी म्हणाले, “मी ही संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानतो. मी या संस्थेला १० वर्ष दिल्यानंतर आता पुढे जाऊ इच्छितो. कोविड १९ च्या काळात ही २४ तास सेवेसारखी नोकरी झाली होती. मला आता स्वतःला आणि परिवाराला वेळ द्यायचा आहे.”
कोरोनाच्या काळात खेळाडूंची सतत कोरोना चाचणी केली जात असायची आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. या काळात साळवी यांची भूमिका खूपच महत्वाची बनली होती. साळवी भारतीय संघासोबत मागच्या मोठ्या कालखंडापासून कार्यरत होते. तसेच बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्यात ३० नोव्हेंबरला त्यांचा नोटिस पिरियड पूर्ण झाला होता, पण तरीही त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध तीन डिसेंबरला सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांच्या त्यांची सेवा पुरवली होती. या कसोटी सामन्यानंतर त्यांनी संघाची साथ सोडली.
मागच्या वर्षीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना भारतीय संघासोबत कोरोनाच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि यावर्षी जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जावे लागले होते. तसेच आयपीएल २०२० आणि २०२१ मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. बीसीसीआयच्या आयोजनात नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकात देखील साळवी यांनी वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी घेतली होती. सध्या भारतीय संघ कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला आहे, पण यावेळी त्यांच्यासोबत साळवी नाहीत.
महत्वाच्या बातम्या –
स्टिव्ह स्मिथची पुनरागमनात कर्णधारपदाला साजेशी खेळी, ‘फॅब फोर’मधील ‘या’ दिग्गजावर ठरला सरस
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर
न्यूझीलंडच्या ३४ वर्षीय गोलंदाजाने केली तरूणांना लाजवेल अशी कामगिरी; ३.५ षटकात मिळवले ‘इतके’ बळी