भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे कसोटी क्रिकेटला १४४ वर्षानंतर विश्वविजेता संघ मिळाला आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी, भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना, येत्या ४ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ हा दौरा संपेपर्यंत इंग्लंडमध्येच राहणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, भारतीय संघाला बीसीसीआयने परवानगी दिली होती की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर खेळाडू आपल्या कुटुंबीयांसोबत बायो बबलमधून बाहेर पडू शकतील .परंतु खेळाडूंची सुट्टी रद्द होऊन ते बायो बबलमध्येच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Bcci doing a re think on break from bio bubble for Virat Kohli and company before the England test series)
यामागचे कारण असे की, इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनी इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले की,”आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जर परिस्थिती बिकट झाली तर, त्या अनुषंगाने आम्ही पुढील निर्णय घेऊ. आम्ही अद्याप त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही.”
भारताचा इंग्लंड दौरा
इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी, भारतीय संघाला काही वेळ बायोबबल पासून सुट्टी मिळणार होती. परंतु गेल्या दोन आठवड्यात इंग्लंडमधील कोरोना रुग्णांची सरासरी ५००० ने वाढून जवळपास १०,००० इतकी झाली आहे. यावर पर्याय म्हणून बीसीसीआय खेळाडूंना, इतर देशात जाऊन राहण्याचा पर्याय सुचवू शकतो. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय कसोटी संघाला ४२ दिवसांची सुट्टी मिळाली आहे. ४ ऑगस्टला पहिला कसोटी सामना होण्यापूर्वी भारतीय संघाला इंट्रास्क्वाड सराव सामना देखील खेळायचा आहे.
असा आहे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला, केएस भारत
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात वॅटलिंगने अव्वल यष्टीरक्षक धोनीला पछाडलं, मोडला ‘हा’ विक्रम
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया
कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझा हा निर्णय योग्यचं होता’