इंडियन प्रीमियर लीग (IPL) खूप थोड्या काळात जगातील सर्वात लोकप्रिय लीगपैकी एक बनली आहे. आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यासाठी जो खर्च येतो, त्यातील मोठी रक्कम प्रसारक कंपनीकडून मिळत आहे. आयपीएल २०२२ पर्यंत डिज्नी-स्टारकडे लीगच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. अशात २०२३ साठी बीसीसआयला लवकरच नवीन प्रासारक शोधावा लागणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (jay shah) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
जय शाह यांनी सांगितले की, आयपीएलचे मीडिया अधिकारांच्या बदल्यात मिळणारी रक्कम स्पर्धेच्या विकासावर परिणाम करणार आहे. आयपीएल २०२२ पासून लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटंन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी होणार आहेत आणि यामुळे नक्कीच आयपीएलच्या विकासावर चांगला परिणाम पडणार आहे. यावर्षी ८ ऐवजी १० संघ आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार आहेत.
शाह म्हणाले की, आयपीएलचे मुल्य सर्वांच्या अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. यावेळी बोलाताना शाह कोणत्यारी ठरावीक रकमेवर बोलले नाहीत, पण म्हणाले की, जी काही रक्कम मीडिया अधिकारातून येईल ती स्पर्धेच्या विकासासाठी उपयोगी पडेल. त्यांनी सांगितले की, बीसीसीआय पुढच्या आठवड्यात २०२३ ते २०२७ साठी निविदा जारी करणार आहे आणि दोन महिन्यात ई-लिलाव पूर्ण केला जाईल. आशा आहे की, यातून ५०० अब्ज रुपये मिळतील.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोर्ड विभिन्न प्रस्तावांवर विचार करेल. तसेच टीव्ही आणि डिजिटल अशा वेगवेगळ्या लिलावावर देखील विचार करेल. याचाच अर्थ असा होते की, ऍमेझॉन, रिलायन्स, सोनी आणि डिज्नी अशा कंपन्यांमध्ये आयपीएल प्रसारणाच्या टीव्ही आणि डिजिटल अधिकारांसाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो. प्रसारणाचे अधिकार मिळवण्यासाठी ५०० अब्ज रुपयांपर्यंत बोली लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शाह म्हणाले की, “आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद संघ सहभागी झाले आहेत आणि त्यांच्या येण्याने लीगला फायदा झाला आहे. फक्त १४ हंगामात आम्ही अभुतपूर्व आकडे नोंदवले आहेत आणि इतर लोकप्रिय लीगपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही फक्त टेलिव्हिजनच नाही, तर डिजिटलवर देखील पाहिले जात आहोत.”
डिज्नीच्या मालकीची स्टार इंडिया कंपनी सर्वात मोठ्या प्रसारक कंपन्यांपैकी एक आहे. स्टार आणि सोनीने २०२२ पर्यंतच्या आयपीएल प्रसारणाचे अधिकार तब्बल १६३.४८ अब्ज रुपयांमध्ये मिळवले होते. आता पुढच्या वेळी हे अधिकार कोणत्या कंपनीकडे जातात हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आयपीएल २०२२ चा हंगाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
महागुरू द्रविडने कमी केला होता पदार्पणवीर आवेश खानवरचा दबाव, दिला होता ‘हा’ झक्कास मंत्र
पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर