ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ट्रॉय कूली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) नवीन गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतात. माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्यांना तीन वर्षांसाठी ही जबाबदारी देऊ शकते. कूली यांना जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते.
कूली हे गोलंदाजी प्रशिक्षक असताना २००५ च्या ऍशेसमध्ये इंग्लंडने आस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अँड्र्यू फ्लिंटॉफ, मॅथ्यू हॉगार्ड, सायमन जोन्स आणि स्टीव्ह हार्मिसन यांच्या यशाचे श्रेय कूली यांना दिले जाते. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना ट्रॉय कूली यांना एनसीएचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करायचे असून, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. २००५ च्या ऍशेसनंतर, ऑस्ट्रेलियाने कूली यांना आपले गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर त्यांनी २०११ पर्यंत संघासह काम केले. नंतर ते ब्रिस्बेनमधील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामील झाले होते.
हे भारतीय असणार एनसीएचा भाग
भारताचे माजी क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर, शिव सुंदर दास आणि सितांशु कोटक यांची एनसीएमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोचिंग स्टाफचा भाग म्हणून कोटक यांचे नाव आधीच देण्यात आले आहे. भारताचे माजी फिरकीपटू साईराज बहुतुले हे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असतील. यासोबत बीसीसीआयने विशेष नियुक्त केलेले तीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सुभदीप घोष, टी दिलीप आणि मुनीश बाली हे आहेत. दिलीप सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ संघासोबत काम करत आहे तर सुभदीप अ संघासोबत दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. बाली एकोणीस वर्षाखालील संघासोबत काम करण्याची अपेक्षा आहे.






