देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची मानली जाणारी रणजी ट्रॉफी (ranji trophy 2022) स्पर्धा काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयने यावर्षीची रणजी ट्रॉफी दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळली जाणार असल्याचे सांगितले आहे. आता या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनासंदर्भात महिती समोर येत आहे. स्पर्धेची सुरुवात १७ फेब्रुवारीपासून होणार आहे. वृत्तानुसार मंगळवारी बीसीसीआयने सर्व संघांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये खेळली जाणार आहे. आपीएल २०२२ च्या आधी पहिला टप्पा खेळला जाईल. तर आयपीएलनंतर दुसरा टप्पा खेळला जाईल. स्पर्धेत सहभागी होणार्या संघांसाठी नऊ वेगवेगळ्या ठिकाणांवर बायो बबल तयार केला जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी सर्व ३८ संघ पाच दिवसांच्या विलगीकरणातून जातील. प्रत्येक संघातील सदस्यांची संख्या ३० असेल. या ३० पैकी कमीत कमी २० सदस्य हे खेळाडू असतील. तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची संख्या जास्तीत जास्त १० असेल. संघ कोरोनामुळे दोन खेळाडूंना राखीव ठेऊ शकतो.
माहितीनुसार, सर्व संघांना त्यांचे सामने ज्या शहरात असतील त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अंतिम तारीखही दिली गेली आहे. सर्व संघ १० फेब्रुवारीपर्यंत संबंधित शहरांमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर पुढचे पाच दिवस विलगीकरणात राहतील. विलगीकरणातील खेळाडूंची दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. संघांकडे सरावसाठी १६ आणि १७ फेब्रुवारी या दोन दिवसांचा वेळ असेल. संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यावर उपाय म्हणून प्रत्येक संघात डॉक्टर असणार आहे.
बीसीसीआयने आगामी रणजी हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडूंसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. संघात सहभागी होणाऱ्या सर्व २० खेळाडूंना मोबदला मिळणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील असणाऱ्यांना १०० टक्के रक्कम मिळेत, तर राहिलेल्या खेळाडूंना ५० टक्के रक्कम दिली जाईल. यापूर्वी एका सामन्यासाठी आयोजकांना पाच लाख रुपये मिळायचे. यावर्षी मात्र सामन्यातील प्रत्येक दिवसासाठी १.२५ लाख रुपये मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम
‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी आयसीसीने जाहीर केली नामांकने; ‘बेबी एबी’चाही समावेश
‘यंग इंडिया’ ते ‘टीम इंडिया’ प्रवास नाही सोपा! ‘इतक्या’ खेळाडूंच्या नशिबी आली निळी जर्सी






