मुंबई । ऑस्ट्रेलियामध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा संकटात सापडली आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धा घ्यायचे की नाही याबाबत आयसीसीने अद्याप निर्णय घेतला नाही. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर हे स्पर्धेविषयी निर्णय घेण्यासंदर्भात जाणून बुजून विलंब लावत असल्याचा आरोप बीसीसीआयच्या वतीने करण्यात येतोय.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स यांनी टी२० विश्वचषक स्पर्धा भरविण्याविषयी असमर्थता यापूर्वीच व्यक्त केली आहे. विश्वचषकाच्या संदर्भात आयसीसी अंतिम निर्णय घेत नसल्याने त्याचा परिणाम आयपीएलच्या नियोजनावर होऊ शकतो, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शंशाक मनोहर विश्वचषक भरविण्याविषयी भ्रम निर्माण करत आहेत. त्यांना विश्वचषकाचे आयोजन करायचे नसेल तर या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिना कशाला हवा आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.”
बीसीसीआयच्या मते, “हा प्रश्न बीसीसीआय किंवा आयपीएलशी संबंधित नाही तर विश्वचषक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय झाला की सदस्य देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्याचा मार्ग मोकळा होईल. ज्या देशातील खेळाडू आयपीएलचा हिस्सा नाही ते या द्विपक्षीय मालिकेत खेळू शकतात. प्रत्येक देश आपल्या देशामध्ये विविध मालिका खेळू शकतो. निर्णय उशिरा घेतल्यास याचा फटका सर्वांनाच बसू शकतो.”
मागील महिन्यात १० जून रोजी आयसीसीची ऑनलाईन बैठक झाली. क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये कोरोनाची सद्य परिस्थिती कशी आहे?याचा अंदाज घेऊन पुढील महिन्यात निर्णय घेण्यात असल्याचे आयसीसीने सांगितले.
आयसीसी टी२० विश्वचषकाविषयी लवकर निर्णय घेतल्यास बीसीसीआयला आयपीएलच्या नियोजनाचा मार्ग मोकळा होईल जर या स्पर्धा परदेशात भरवायचे असेल तर संबंधित देशाला तयारीसाठी वेळ मिळणार आहे.